लोको पायलटला थोडा आराम करू द्या! मध्य रेल्वेकडून क्रू रनिंग रूम, बुकिंग लॉबी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 11:01 AM2024-07-10T11:01:03+5:302024-07-10T11:02:49+5:30
गाड्या सुरक्षित व सुरळीत चालवण्यासाठी या कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत पुरेशी विश्रांती, आराम आणि तणावमुक्त वातावरण मिळणे महत्त्वाचे आहे.
मुंबई : सतत कामगिरीवर असणाऱ्या लोको पायलट व ट्रेन मॅनेजर यांना विश्रांतीसाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे क्रू रनिंग रूम आणि बुकिंग लॉबी उपलब्ध करून दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये ट्रेनच्या वेळापत्रकाप्रमाणे आधारित दिवस व रात्री पाळीसह अवघड तासांमध्ये काम करणे समाविष्ट असते.
गाड्या सुरक्षित व सुरळीत चालवण्यासाठी या कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत पुरेशी विश्रांती, आराम आणि तणावमुक्त वातावरण मिळणे महत्त्वाचे आहे. तळमजला अधिक ५ मजली ही इमारत मध्य रेल्वेवरील सर्वात मोठी रनिंग रूम (क्षमतेनुसार) असून १९२ खाटांची क्षमता असलेल्या इमारतीत महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र खोल्या आणि स्वच्छतागृहे आहेत. तळमजल्यावर क्रू बुकिंग लॉबी, लोको निरीक्षक कक्ष, लिनेन तसेच सामान कक्ष, सुरक्षा कक्ष, सुरक्षा रक्षक कक्ष, हाउसकीपिंग खोली व २ स्वच्छतागृहे आहेत.
अशी आहे रचना-
१) यात महिला कर्मचारी वर्गासाठी काही खोल्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक मजल्यावर २ बाल्कनी आहेत. प्रत्येक मजल्यावर १२ स्वच्छतागृहे असून, यात प्रत्येक मजल्यावर ३ स्वच्छतागृहे महिलांसाठी आहेत.
२) इतर सुविधांमध्ये प्रत्येकी ८ व्यक्तींना वाहून नेण्याची क्षमता असलेल्या २ लिफ्ट, १ लाख लिटर क्षमतेची भूमिगत पाण्याची टाकी, ६० हजार लिटर क्षमतेची ओव्हरहेड पाण्याची टाकी आणि १०० किलोव्हॅट क्षमता असलेला पॉवर बँक अप जनरेटर यांचा समावेश आहे.
४८ खोल्यांचा समावेश-
पहिल्या मजल्यावर उपहारगृह व जेवणाचे क्षेत्र, व्यायामशाळा, योग, ध्यान, मनोरंजन, सीएमएस कन्सोल कक्ष व २ स्वच्छतागृहे आहेत. दुसरा मजला ते पाचव्या मजल्यावर ४८ खोल्यांचा समावेश असून, यामध्ये प्रत्येक मजल्यावर १२ वातानुकूलित खोल्या आहेत.