मुंबई : ‘मी सीबीआय इंदूर पोलिसांकडून बोलत असून तुमच्या मोबाइल क्रमांकाचा वापर मानवी तस्करी आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जात आहे. त्यामुळे तुम्हाला अटक करण्यात येणार आहे,’ अशी भीती घालून महिलेकडून ३.९० लाख रुपये उकळण्यात आले. भामट्यांनी बनावट अटक वॉरंटही पाठवल्याची माहिती असून, याप्रकरणी बांगूरनगर पोलीस तपास करत आहेत.
तक्रारदार मिताली पारखी (३१) यांना १२ मे रोजी मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. टेलिफोन कम्युनिकेशन कंपनीतून बोलणाऱ्या निरंजन गिरी याने तुमच्या एका मोबाइल क्रमांकावरून बेकायदा कारवाया होत असल्याचे पारखी यांना सांगितले. तसेच तो कॉल इंदूर पोलिसांशी जोडत असल्याचे भासवले. अनिल यादव याने तो काॅल उचलून तो सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगितले.
पारखी यांना त्यांनी व्हिडीओ कॉल केला असता पोलिसांचा गणवेश परिधान केलेली एक व्यक्ती समोर होती. त्यानंतर ऑडिओ कॉलवर फोन करून पारखी यांची, त्यांचे बँक खाते आणि एकूण गुंतवणुकीबद्दल माहिती त्याने घेतली. त्याने व्हाॅट्सॲपवर पारखी यांना सीबीआयचा लोगो असलेल्या करारनामा, मध्य प्रदेश कोर्टाचा बनावट शिक्का असलेले पत्र व आरबीआयचा शिक्का असलेला बनावट फॉर्म आणि बनावट वॉरंट पाठवले. त्यामुळे पारखी घाबरल्या.
आरोपींनी त्यांच्या खात्यातील सगळे पैसे हे त्यांना पाठवावे लागतील, जेणेकरून त्यांनी ते बेकायदा कमावले किंवा नाहीत, याची पडताळणी करता येईल, असेही सांगितले. पारखी यांनी त्यांना टप्प्याटप्प्याने ३.९० लाख रुपये पाठवले. मात्र, संशय आल्यावर प्रश्न विचारताच उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांनी तक्रार केली.