Join us  

मध्य रेल्वेचे ‘हे’ चार मोटरमन ठरले प्रवाशांचे जीवरक्षक; कठीण काळात सतर्कतेमुळे अपघात टाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 10:04 AM

मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सामान्य मुंबईकरांचा आधार आहे.

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सामान्य मुंबईकरांचा आधार आहे. सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसह मोटरमन आणि लोको पायलट यांची अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका असते. मागील दहा दिवसांमध्ये चार मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपघात आणि जीवितहानी टळल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.  

काम करताना बरेचदा पाऊस, अपघात, तांत्रिक अडथळे, कधीतरी आंदोलने अशा आव्हानांचा सामना मोटरमन / लोको पायलट यांना करावा लागतो. बरेचदा त्यांच्या डोळ्यासमोर एखादी व्यक्ती लोकलसमोर स्वतःला झोकून देते. पण एका व्यक्तीला वाचवण्यासाठी ताबडतोब ब्रेक दाबून लोकलमधील हजारो प्रवाशांचे जीव धोक्यात घालता येत नसल्याने डोळ्यासमोर त्याचा मृत्यू पाहण्याशिवाय मोटरमनच्या हातात काहीच राहत नाही. 

ही वेदना अनेक मोटरमनना कायम छळत असते. मात्र, स्वतःच्या भावनांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देत ते आपले काम करत राहतात. 

ब्रेक लावत ट्रेन थांबवली-

२० जून रोजी कल्याण लोकलचे मोटरमन एस. सी. मीना यांना सीएसएम टर्मिनसच्या आधी ट्रॅकवर लोखंडाचा तुकडा पडलेला दिसला. दरम्यान त्यांनी तत्काळ इमर्जन्सी ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवली. त्यांनतर तो तुकडा काढून टाकण्यात आला आणि बराच वेळ अडकलेली ट्रेन पुढे सरकली. 

वायर लटकलेली दिसली-

१३ जून रोजी,  सिंहगड एक्स्प्रेसचे लोको पायलट ए. ए. खान यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १० मध्ये येत असताना, रेल्वेच्या टपाला लागेल अशा बेतात एक वायर लटकलेली दिसली. त्यांनी ताबडतोब ब्रेक लावला, वायरच्या संपर्कात येण्यापूर्वी ट्रेन थांबविली. नियंत्रण कार्यालय व इतर संबंधित कर्मचाऱ्यांना लगेच कळविण्यात आले आणि तार काढून टाकण्यात आली.

दाखविले प्रसंगावधान-

१५ जून रोजी, कुर्ला-कल्याण लोकलचे मोटरमन शैलेश कांबळे यांना एक माणूस रुळावर पडलेला दिसला. त्यांनी तत्काळ लोकल थांबवून मॅनेजरला कळवले. जखमी अवस्थेत सापडलेल्या या व्यक्तीला त्याच लोकलमधून डोंबिवली स्टेशन कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. 

आवाज आला आणि...

२० जून रोजी दादर-डोंबिवली लोकलवर कार्यरत असलेले मोटरमन हरेंद्र कुमार यांना दादर येथे सिग्नलवरून पुढे गेल्यावर लोकल कॅबच्या चाकातून आवाज आला. त्यांनी ताबडतोब ब्रेक लावला दादर येथे ट्रेनची तपासणी केली असता चाकामध्ये लोखंडी तार अडकल्याचे आढळून आले. स्टेशन कर्मचाऱ्यांनी चाकाला अडकलेली तार काढली आणि ट्रेन पुढे सरकली. 

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वे