Join us

चौदा दिवसांचा पाऊस एका दिवसात; बुधवारी सरासरी १३१ मिलिमीटरची नोंद, यंदा दसऱ्यापर्यंत मुक्काम कायम  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 9:44 AM

साधारणपणे १५ दिवसांचा पाऊस बुधवार ते गुरुवारदरम्यान पडल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. या पावसाने अर्थातच मुंबईत दाणादाण उडविली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या ३० दिवसांत मुंबईत सरासरी ३५० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद होते. बुधवारी सकाळपासून गुरुवारी सकाळपर्यंत मुंबईत ठिकठिकाणी १५० मि.मी.पासून २८० मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. हा सरासरी १३१ मि.मी. पाऊस आहे. त्यामुळे मुंबईत दोन आठवड्यांचा पाऊस एकाच दिवसात झाला.

साधारणपणे १५ दिवसांचा पाऊस बुधवार ते गुरुवारदरम्यान पडल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. या पावसाने अर्थातच मुंबईत दाणादाण उडविली. दसऱ्यापर्यंत मुंबईत पावसाचा मुक्काम कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत मुंबईत ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने लोकलसह रस्ते वाहतूक कोलमडली होती. 

छातीएवढे पाणी-

कुर्ला पश्चिमेकडील शीतल सिग्नल परिसरात बुधवारी रात्री पडलेल्या पावसामुळे छातीएवढे पाणी तुंबले होते. या पाण्यात चारचाकी कार तरंगत होत्या. येथे पाणी भरल्याने अंधेरी, सांताक्रूझ, वांद्रे आणि घाटकोपर या दिशांकडे जाणारी रस्तेवाहतूक ठप्प झाली होती.

सप्टेंबर महिन्यात मुंबईत सरासरी एकूण ३५० मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. बुधवारी सकाळी ८:३० वाजेपासून गुरुवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत मुंबईत ठिकठिकाणी २८० मि.मी.पर्यंत पावसाची नोंद झाली आहे. महिन्याभरातील निम्मा पाऊस एका दिवसात झाला.- अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक

कुठे साचले होते पाणी?

हिंदमाता, दादर टीटी, सक्कर पंचायत, शिवडी रेल्वेस्थानक, कुर्ला रेल्वेस्थानक, चेंबूर टेंभी पूल, घाटकोपर वेलकम हॉटेल, विक्रोळी गोदरेज जेटी, कांजूरमार्ग- हुमा मॉल, चेंबूर - स्वस्तिक पार्क, मानखुर्द रेल्वेस्थानक, चुनाभट्टी- भक्तिधाम मंदिर, पवई - क्रिस्टल हाऊस, विक्रोळी - परेश पार्क, अंधेरी सबवे, अंधेरी मार्केट, मालाड - साईनाथ सबवे २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान मुंबईत ३२० मि.मी. पाऊस पडला. सप्टेंबरच्या एकूण सरासरी ३८४ मि.मी. पावसाच्या ८३ टक्के इतका हा पाऊस आहे. सप्टेंबरचे अजून ४ दिवस बाकी आहेत. २०१९ मध्ये सप्टेंबरमध्ये १,११६ मि.मी. पाऊस पडला होता. 

सांताक्रूझमध्ये २४ तासांत १७० मि.मी. पावसाची नोंद झाली; तर १९८१ मध्ये सप्टेंबर महिन्यात २४ तासांत ३१८ मि.मी. पाऊस पडला होता, अशी माहिती वेगरीज ऑफ द वेदरकडून देण्यात आली.

मुंबईत आता पडत असलेला पाऊस हा परतीचा नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा हा परिणाम आहे. मुंबईसह आसपासच्या परिसरात शुक्रवारीही पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. चार दिवस ब्रेक घेतल्यानंतर ३ ऑक्टोबरनंतर मुंबईत परतीच्या पावसाला सुरुवात होईल. दसऱ्यापर्यंत रोज सायंकाळी मुंबई पावसाची शक्यता आहे. - राजेश कपाडिया, वेगरिज ऑफ द वेदर

टॅग्स :मुंबईपाऊस