‘रिफंड’ म्हणून रेल्वे अधिकाऱ्याच्या खात्यात फसवणुकीची रक्कम; ३८ लाख रुपयांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 09:36 AM2024-08-30T09:36:46+5:302024-08-30T09:44:00+5:30
या प्रकरणी भोईवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रेल्वे अधिकाऱ्याच्या मैत्रीचा फायदा घेत त्यांना व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखविले. रेल्वे अधिकाऱ्याने ३८ लाखांची गुंतवणूक केली. नफा न मिळाल्याने त्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावताच, गुंतवलेली रक्कम परत करण्याच्या बहाण्याने याच अधिकाऱ्याच्या नावाने काही तरुणांना रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून फणवणुकीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वळते केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी रेल्वे अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पुण्यातील रहिवासी असलेले ४९ वर्षीय तक्रारदार हे रेल्वे विभागात वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक पदावर नोकरीला आहेत. ते मुंबईत कार्यरत असताना त्यांची औरंगाबादमधील संजय सुतारशी मैत्री झाली.
तक्रारीनुसार, जून २०२१ मध्ये सुतार याने मस्जिद बंदर येथील रहिवासी तुफेल अहमद आणि नवी मुंबईतील रहिवासी निरंजन वेलूस्वामी यांची भेट घालून दिली. दोघेही हॉटेल आणि प्लास्टिक ग्रॅन्युएल्सच्या व्यवसाय करत असल्याचे त्या ओळखीच्या मित्राने सांगितले होते.
पुढे, अहमद आणि वेलूस्वामी यांनी तक्रारदार यांना त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष दाखविले. त्याला बळी पडून तक्रारदार आणि त्यांच्या भावाने एकूण ३८ लाख १५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. नफ्याची रक्कम परत मिळत नसल्याने त्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. तक्रारदार यांनी पैशांसाठी तगादा लावताच दोघांनी तक्रारदार आणि त्यांच्या भावाच्या बँक खात्यात ३३ लाख ४९ हजार रुपये जमा केले.
...अन् बसला धक्का
१) डिसेंबर २०२३ मध्ये एक तरुण तक्रारदार यांच्या कार्यालयात आला. त्याने तुफैल अहमद याने पाठविल्याचे सांगून पैसे परत करण्यास सांगताच त्यांना धक्का बसला. चौकशीत तुफेल आणि वेलुस्वामीने रेल्वे अधिकारी नोकरी मिळवून देणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे समोर आले. हीच फसवणुकीची रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली होती.
२) पुणे पोलिसांनी तक्रारदारांना चौकशीसाठी बोलविल्यानंतर संबंधित तरुणाने तक्रारदारांविरोधात रेल्वेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याची तक्रार दिल्याचे समजले. अखेर सुतार, अहमद, वेलुस्वामी यांनी आपली फसवणूक केल्याची खात्री पटल्याने तक्रारदार यांनी भोईवाडा पोलिसात धाव घेतली.