Join us  

कॅनडात नोकरीच्या बहाण्याने फसवणूक; ३८ लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 3:53 PM

कॅनडामध्ये नोकरीचे प्रलोभन दाखवत तीन उमेदवारांची ३७ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.

मुंबई : कॅनडामध्ये नोकरीचे प्रलोभन दाखवत तीन उमेदवारांची ३७ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी त्यांनी साकीनाका पोलिसांत तक्रार दिल्यावर कॅनडातील कथित कंपनीचा मालक व एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सिमरनजित सिंग (२३) यांच्या तक्रारीनुसार, २४ जूनला त्यांच्या काकांनी कॅनडामध्ये नोकरीला पाठविणारा हरजित सिंग (५०, रा. चंडीगड) या एजंटशी त्यांची ओळख करून दिली होती. सिमरनजित यांनी हरजितशी संपर्क साधल्यावर कॅनडातील गेट गोरमेंट कंपनीत भरती असल्याचे सांगत दिल्लीत २८ जूनला मुलाखतीला बोलावले. तेथे सिमरनजित यांची नवदीप सिंग (३१), आदर्श कुमार (२४) यांच्याशी ओळख झाली. कंपनीचा मालक मोहित चड्डा (५२) याने उमेदवारांची मुलाखत घेत व्हिसासाठी मुंबईतील कॅनडा दूतावास कार्यालयात हरजितसोबत पाठवले. हे सर्व ३० जूनला मुंबईत आले. साकीनाका येथे एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. तेथे पुढील प्रक्रियेसाठी अजून दोन दिवस लागतील, असे हरजितने त्यांना सांगितले. ते तेथे हरजितसह थांबले. २ जुलैला रात्री सिमरनजित, नवदीप व आदर्श यांचे मोबाइल, तसेच ऑदर्शचा लॅपटॉप चोरीला गेला. हरजित याचा मोबाइलही बंद होता.

पासवर्ड बदलून काढले पैसे-

१) मुंबईत कोणाला ओळखत नसल्याने ३ जुलैला सिमरनजित यांनी साकीनाका येथील पंजाब नॅशनल बँकेत पासबुकद्वारे पैसे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या खात्यातून सहा लाख सहा हजार रुपये काढल्याचे त्यांना समजले.

२) नवदीपच्या खात्यातून २५ लाख ६९ हजार, तर आदर्श कुमारच्या खात्यातून सहा लाख २१ हजार रुपये काढण्यात आले होते. हे पैसे मोबाइलमधील बँक खात्याचे पासवर्ड बदलून गोपनीय माहितीद्वारे काढल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे.

३) याप्रकरणी त्यांनी हरजित सिंग आणि मोहित चड्डा यांच्याविरोधात तक्रार दिली.

४) साकीनाका पोलिसांनी हरजित आणि मोहित यांच्यावर भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कायद्याचे कलम ३ (५), ३०५, ३१८ (४),३१९ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस