‘अटल सेतू’वरून आता गाठा थेट मंत्रालय; 'एनएमएमटी'च्या खारघर, नेरूळहून बस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 11:00 AM2024-09-12T11:00:53+5:302024-09-12T11:04:31+5:30
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने अर्थात 'एनएमएमटी'ने गुरुवारपासून खारघर आणि नेरूळ येथून अटल सेतू मार्गे दोन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आता नवी मुंबईतूनमंत्रालयात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. त्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने अर्थात 'एनएमएमटी'ने गुरुवारपासून खारघर आणि नेरूळ येथून अटल सेतू मार्गे दोन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील ११६ क्रमांकाची बस नेरूळ डेपोतून, तर ११७ क्रमांकाची बस खारघर सेक्टर ३५ येथून सुटेल. या दोन्ही गाड्यांमुळे नवी मुंबईतील प्रवाशांना कमीतकमी वेळेत मंत्रालय गाठणे शक्य होणार आहे.
नवी मुंबईतून मंत्रालयापर्यंत जाण्यासाठी एनएमएमटी तसेच बेस्ट उपक्रमाच्या अनेक गाड्या आहेत. परंतु, या गाड्यांना लागणारा वेळ, गैरसोयीचे वेळापत्रक आदींमुळे गैरसोय होते. त्यामुळे मंत्रालयापर्यंत अटल सेतू मार्गे जलद पोहोचता यावे यासाठी विशेष बसची मागणी प्रवाशांनी केली होती. त्यानुसार गुरुवारपासून एनएमएमटीने नेरूळ ते मंत्रालय (मार्ग क्रमांक ११६) आणि खारघर ते मंत्रालय (मार्ग क्रमांक ११७) या दोन जलद वातानुकूलित गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. ११६ क्रमांकाची बस सोमवार ते शनिवार असे सहा दिवस सोडण्यात येणार आहे.
असा असेल मार्ग-
१) नव्याने सुरू करण्यात आलेली ११६ नंबरची बस मोठा उलवा गाव, प्रभात हाईट्स, रामशेठ ठाकूर स्टेडियम, खारकोपर रेल्वे स्थानक मार्गे अटल सेतूवरून मंत्रालयापर्यंत जाणार आहे.
२) तसेच ११७ क्रमांकाची बस खारघर येथून उत्सव चौक, असूडगाव आगार हायवे, पनवेल बस स्थानक, पळस्पे फाटा, करंजाडे फाटा मार्गे अटल सेतूपर्यंत पोहोचेल आणि तेथून मंत्रालयाच्या दिशेने जाईल.