लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेशोत्सव म्हटला की, मुंबईसह कोकणातील घराघरांत गणेशभक्त आरत्या आणि भजनांमध्ये तल्लीन झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे या काळात वाद्यांना मोठी मागणी असते. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने लालबाग येथील बाजारात भजनी मंडळे आणि गणेशोत्सव मंडळांची टाळ, ढोलकी, मृदंग, तबला, डग्गा, पखवाज खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्याचबरोबर अनेकांनी आपली वाद्ये अगोदरच दुरुस्त करून घेतली आहेत.
गणेशोत्सव आणि मृदंग, तबला यांचे नाते फारच जवळचे आहे. आरतीसाठी टाळासोबत या वाद्यांचे असणे हा पायंडाच आहे. मुंबईत तयार होणाऱ्या वाद्यांना कोकणात चांगली मागणी असते. तसेच मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नोकरदारांचीही लालबागमधील दुकानांत सध्या खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. वाद्यांच्या दुकानांत ढोलकीला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले. तालवाद्यांच्या चामड्याची गॅरंटी दिली जात नाही, परंतु वाद्याचे खोड किंवा इतर भाग नादुरुस्त झाल्यास, त्यावर स्वत: प्रयोग न करता ते थेट कारागिरांकडे दुरुस्तीसाठी घेऊन यावे, असा सल्ला दुकानदार देत आहेत.
वाद्यांसाठी लागणारे चामडे सोलापूरमधून मागविले जाते, तसेच ढोलकी, मृदंग, तबला आणि डग्गा आदी वाद्यांसाठी लागणारी शाई गुजरातमधील भावनगर येथून मागविली जाते.
आमच्या पणजोबांपासून म्हणजे किमान ११० वर्षांपासून आम्ही या वाद्य विक्रीच्या व्यवसायामध्ये आहोत. गणेशोत्सवाच्या आधी ६ ते ७ महिन्यांपासून लाकूड सुकवणे, त्यानंतर त्यावर चामडे चढवणे, त्याला शाई लावणे या प्रक्रिया केल्या जातात. त्याकरिता थोडा थोडा वेळ जावा लागतो. त्यानंतर गणेशोत्सवाआधी दीड महिन्यापासून विक्रीस सुरुवात होते. दरवर्षी गणेशोत्सवाच्या अगोदर कोकणातून आमच्याकडे वाद्यांची सर्वाधिक मागणी नोंदवली जाते. त्याचबरोबर मॉरिशस, अमेरिका आणि इंग्लंड येथेदेखील आम्ही वाद्ये पाठवतो. - प्रितेश चौहान, तबला व्यावसायिक, लालबाग