लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. सरबराईत उणीव राहू नये, यासाठी प्रत्येकाने जबाबदारी वाटून घेतली आहे. काम सांभाळून खरेदी, सजावटीसह बाप्पांच्या नैवेद्यात वैविधता आणण्यासाठी गृहिणींनी कंबर कसली आहे. घरातील साफसफाईनंतर आता मोर्चा सजावटीकडे वळला असून पुरुष मंडळींसोबत चिमुकल्यांनी सजावटीचा, तर सुगरणींनी बाप्पांच्या नैवेद्याचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. त्यासाठी मोदकांबरोबरच विविध गोडाधोडाच्या रेसिपी शोधून महिलांनी नेवैद्याचे वेळापत्रक आखले आहेत.
चॉकलेट, ड्रायफ्रूट्स मोदकांना पसंती-
गणरायाच्या आवडत्या उकडीच्या मोदकांसह बाजारात नानाविध मोदक बाप्पांसाठी तयार करण्याची लगबग सुरू आहे. उकडीचे, कणकीचे, खवा, मावा, ड्रायफ्रूट्स यांच्यासह चॉकलेटच्या मोदकांना चांगली मागणी आहे. शिवाय हे सर्व मोदक घरच्या घरी करणे सहज शक्य असल्याने महिलांकडून त्यांची विशेष तयारी सुरू आहे.
सजावटीसाठी चिमुकलेही पुढे-
१) बाप्पांच्या स्वागतासाठी लाइटच्या माळा, आर्टिफिशिअल फुलांच्या माळा, आकर्षक मखर आदींसह विविध प्रकाराचे सजावटीचे साहित्य पसंतीनुसार खरेदी केले जात आहे. त्यांची खरेदीही जोरात सुरू आहे. अनेकांनी साहित्य खरेदी करून घरच्या घरीच आकर्षक सजावट करण्यावर भर दिला आहे.
२) पुरुषमंडळींसह चिमुकले हातही त्यांच्या लाडक्या बाप्पांच्या सजावटीत खारीचा वाटा उचलत आहेत. प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी असल्याने गणरायांना विराजमान करण्यासाठी घरीच त्यांच्यासाठी छत, आसन, मखर करण्याला अनेकांनी प्राधान्य दिले आहे.
३) वेद्यासाठी मोदकांबरोबरच यंदा गोडधोड पदार्थही घरीच बनवण्यासाठी गृहिणी पुढे सरसावल्या आहेत. पारंपरिक पदार्थांसह विविध रेसिपींसाठी यूट्यूबवर पदार्थांचा शोध सुरू केला आहे. बाप्पांच्या सेवेत कुटुंबच्या कुटुंब रंगलेले दिसत आहे.
हे पदार्थ वाढविणार नैवेद्याची चव-
१) बदामाचा, रवा-केळीचा शिरा, पुरणपोळी, पंचखाद्य, खिरापत, विविध प्रकारचे लाडू, खीर, पेढे, ओल्या नारळाच्या करंज्या, साखर भात या पारंपरिक पदार्थांसह उकडीचे रोल, कॅरॅमल मखाणे, स्पाईसी मखाणे, मखाण्याची खीर, मालपुआ बटाट्याचा शिरा, ड्रायफ्रूट्स बाॅल, रसमलाई, पायसम, बासुंदी, ज्वारी बॉल्स, पान मोदक, उपवास दही बटाटा पुरी, उपवास खांडवी, मटार करंजी, सुन्दल, साबुदाणा लाडू, ज्वारी नूडल्स, शेंगदाणे उसळ, शिंगाडा भजी-ढोकळा-वरीचा पुलाव, लाल भोपळा घारगे, सुरण कबाब, रताळे पॅटीस-काप फ्रूट बॉल्स.
२) दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या दणक्यात साजरा करणार आहे.आमच्याकडे पाच दिवसांचा गणपती असतो. त्यामुळे त्यांना रोज वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवतो. त्यामुळे त्यातही वैविध्य असावे, यासाठी आतापासून रेसिपींचा शोध सुरू केला असून त्यानुसार सकाळ, संध्याकाळचे वेळापत्रकही तयार करून ठेवले आहे. त्यासाठीची खरेदीही झाली असून, आता केवळ बाप्पांच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. - माहेश्वरी फडतरे, गृहिणी