लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेशोत्सवात पुण्यातील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यासाठी ज्या पद्धतीने काम होईल; त्याच पद्धतीने मुंबईत काम केले जावे, यासाठी महापालिका, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकत्र काम करावे, याकडे आवाज फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुलअली यांनी लक्ष वेधले आहे. तरच मुंबईमधील ध्वनी प्रदूषण कमी होईल, असे सुमेरा यांनी सांगितले.
पुण्यातील एका प्रकरणात हरित लवादाने गणेशोत्सवासंदर्भात दिलेल्या निर्देशांत, डीजे वाजविण्यात येऊ नये. प्रदूषण मंडळाला पुण्यात तीन जागी ध्वनी प्रदूषण मोजणे आहे आणि त्याचे आकडे प्रदर्शित करणे आहे.
पोलिसांना प्रकरणे दाखल करत पब्लिक नोटीस द्यावी लागेल, याचा समावेश आहे, अशी माहिती सुमेरा यांनी दिली.
दरम्यान, हरित लवादाचे निर्देश हे गणेशोत्सवापुरते मर्यादित असले तरी सर्व उत्सवांना या पद्धतीने निर्देश लागू केले तर ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, याकडे आवाज फाउंडेशनने लक्ष वेधले आहे.
ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत-
१) गेल्या २१ वर्षांपासून याबाबत काम करणाऱ्या आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुलअली यांनी आता खूप फरक पडल्याचे सकारात्मक मत व्यक्त केले आहे.
२) गणेशोत्सवात आगमनासह विसर्जनावेळी ध्वनी आणि वायुप्रदूषण होणार नाही, याची खबरदारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घ्यावी. राजकीय नेत्यांनी पुढाकार घेत काम केले पाहिजे.
३) तेव्हा कुठे आवाज कमी होण्यास म्हणजे ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. नियमांचे उल्लंघन झाल्यास १ लाख रुपयांचा दंड आणि पाच वर्षांचा तुरुंगवास या शिक्षेची तरतूद आहे.