लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया’चा गगनभेदी जयघोष, वरुणराजाने अधूनमधून दिलेली सलामी, ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत घरोघरी गणरायाचे आगमन होत आहे. शनिवारपासून पुढील ११ दिवस बाप्पा मुंबईकरांना आपल्या सेवेची संधी देणार आहे. सार्वजनिक मंडळांचे बाप्पा तर २ -३ दिवसांपूर्वीच मंडळात विराजमान झाले आहे.
शुक्रवारी सायंकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाने मुंबईतील रस्ते फुलून गेले होते. भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम मायानगरीत झाला आहे. लहान-थोरांकडून मोठ्या भक्तिभावाने बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली असून, गणपतींच्या आगमनापूर्वी रस्त्यांची डागडुजी आणि कृत्रिम विसर्जन तलाव आदी सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी मुंबईत सुमारे १२ हजारांहून अधिक सार्वजनिक आणि दोन लाखांपेक्षा जास्त घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पावसामुळे शहर आणि उपनगरांतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याने आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये अडथळे येणार असल्याच्या तक्रारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह नागरिकांनी केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने अनेक रस्त्यांवरील खड्डे भरले आहेत, तसेच चौपाट्यांसह ६९ नैसर्गिक जलस्रोत, २०४ कृत्रिम तलावांत गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी सर्व व्यवस्था सज्ज ठेवली आहे.
त्याचबरोबर विभाग स्तरावर फिरती विसर्जन केंद्रे, गणेशमूर्ती संकलन केंद्रे आदींची सुविधा असणार आहे. गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती विसर्जन होते. त्यामुळे येथे विविध सुविधा पुरविण्यासाठी पालिकेने जवळपास महिना ते दीड महिन्यापासून तयारी सुरू केली होती.
२४ प्रभागांमध्ये समित्या-
पालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये प्रत्येकी एक, याप्रमाणे २४ समन्वय समित्यांची स्थापना केली आहे. त्यात पालिकेचे सहायक आयुक्त, संबंधित अधिकारी, पोलिस अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे प्रतिनिधी आदींचा समावेश आहे.
निर्माल्यातून खत निर्मिती -
पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून निर्माल्याचे संकलन आणि विल्हेवाट लावण्याची वेगळी व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे निर्माल्य समुद्रात किंवा तलावात टाकले जात नाही. जलप्रदूषण टाळण्यासाठी गोळा केलेल्या अशा ५०० मॅट्रिक टन निर्माल्यातून गेल्या वर्षी खत तयार करण्यात आले.
अग्निशमन दल, डॉक्टर, रुग्णवाहिका तैनात-
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासह मनुष्यबळाची व्यवस्था, तसेच नियंत्रण कक्षामध्ये निष्णात डॉक्टरांसहित सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे. गणेश विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी टोइंग वाहने, क्रेन्स, जे.सी.बी. मशिन्स, बुलडोझर आदी यंत्रसामग्री देखील विसर्जनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तैनात करण्यात आली आहे.
२,४६२ मंडपांना मंजुरी- पालिकेने २,४६२ यंदा मंडपांना मंजुरी दिली आहे. यंदा पालिकेकडे परवानगीसाठी ३,३२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षी पालिकेकडून एकूण २,७२९ मंडपांना मंजुरी दिली होती. पालिकेच्या म्हणण्यानुसार उर्वरित मंडपांनाही मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
मत्स्य दंशापासून सावध राहा-
मुंबई येथील समुद्र किनारपट्टीवर ‘ब्ल्यू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. या पार्श्वभूमीवर विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
गिरगाव चौपाटीवर विशेष व्यवस्था-
गिरगाव चौपाटी येथे कृत्रिम विसर्जन तलाव, स्टील प्लेट, नियंत्रण कक्ष, जीवरक्षक, मोटरबोट, प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, स्वागत कक्ष, तात्पुरती शौचालये, निर्माल्य कलश, निर्माल्याच्या वाहतुकीसाठी वाहन, फ्लड लाइट, सर्च लाइट, निरीक्षण मनोरे, जर्मन तराफा, मनुष्यबळ आदी व्यवस्था केली आहे.