बाप्पांच्या विसर्जनासाठी २३,५०० पोलिसांची फौज; सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा चौपाट्यांवर ‘वॉच’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 09:56 AM2024-09-16T09:56:43+5:302024-09-16T09:59:07+5:30
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतात
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतात. रस्त्यावर जमा होणारी गर्दी लक्षात घेता, मुंबई पोलिसांचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंबर कसत २३ हजार ४९० पोलिसांचा फौजफाटा सज्ज आहे.
मुंबईतील गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी आणि गणेश घाट पवई या ठिकाणांसह महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा मनोरे उभारण्यात आले आहेत. गणेश मूर्तींच्या विसर्जन दरम्यान रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी वॉच टॉवर उभारले आहेत. गणपती विसर्जनाच्या दिवशी गर्दीवर नियंत्रण ठेवून वाहतूक सुरळीत राहावी म्हणून बॅरिकेडिंग करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
विसर्जनाच्या वेळी वाहने बंद पडल्यास तत्काळ कारवाईसाठी पोलिस क्रेन्स, बीएमसी क्रेन्स तैनात करण्यात आले आहेत. विसर्जनाच्या दिवशी मुंबई पोलिसांकडून बंदोबस्तासाठी २३,४९० पोलिस कर्मचारी तैनात असणार आहे. यामध्ये २,९०० पोलिस अधिकारी आणि २०,५०० पोलिस कर्मचारी विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्तासाठी असणार आहेत.
संस्थांचीही मदत-
वेगवेगळ्या सेवाभावी संस्था, एनजीओ, सिव्हिल डिफेन्स, अनिरुद्ध अकादमी, आरएसपी टीचर्स, एनएसएस आणि स्काऊट- गाईडची सुद्धा मदत घेण्यात येणार आहे.
ड्रोन कॅमेऱ्यांची नजर-
१) संवेदनशील ठिकाणी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
२) मुंबईतील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोन कॅमेऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवण्यात येणार आहे.
३) महिला आणि बालकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे.