लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलादसाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महिला सुरक्षेसाठी महिला अधिकाऱ्यांचे स्कॉड गर्दीच्या ठिकाणी सहभागी होत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे.
अनंत चतुर्दशीला मुंबईत जवळपास दहा हजार सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे. सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरगाव, जुहू, वर्सोवा, पवई, मढसह विविध महत्त्वाच्या ठिकाणचे गणेश विसर्जन होतील. गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास आम्ही कारवाई करू. ध्वनी प्रदूषणबाबत न्यायालयाच्या निर्बंधानुसार कारवाई होणार आहे. नागरिकांनी डीजेचा वापर करू नये, असेही त्यांनी नमूद केले.
९ अपर पोलीस आयुक्त, ४० पोलीस उपायुक्त, ५६ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह ४,०१३ पोलीसअधिकारी व २०,५१० पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. त्यांच्यासोबत महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, होमगार्डस्, महाराष्ट्र सुरक्षा बल आदींना सोबत घेऊन चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व ठिकाणचा आढावा घेत मार्गदर्शन करण्यात येत आहे. महत्त्वाच्या विसर्जनाच्या ठिकाणी कंट्रोल रूम तयार केले आहेत. पाच हजार सीसीटीव्हींच्या मदतीने सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
सणांचा आनंद घ्या-
नागरिकांनी, गणेशोत्सव विसर्जन व ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकांदरम्यान गर्दीच्या ठिकाणी संयम दाखवून पोलिसांना सहकार्य करावे, बेवारस वस्तू आढळल्यास पोलिसांना त्याबाबत माहिती द्यावी. सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवून सण उत्साहाने साजरे करावेत. काही मदत लागल्यास पोलिसांच्या १००, ११२ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.