लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणरायाच्या आगमनाची आता मुंबईकरांना चाहूल लागली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून जोरात तयारी सुरू आहे. गणेशमूर्तींना साजेसा देखावा करण्यासाठी दिवसरात्र एक करणारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यंदा उत्सवाच्या देखाव्यातून महिला अत्याचाराविरोधात संदेश देणार आहेत. मुंबईच्या सार्वजनिक मंडळांचे बाप्पा यंदा राजमहालात विराजमान होणार आहेत.
कोलकाता आणि बदलापूर येथील दुर्घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच यंदाच्या गणेशोत्सवातून महिला सुरक्षा, महिला अत्याचारविरोधी भूमिका आणि महिलांची सुरक्षा आपल्या हाती; अशा आशयाचे देखावे उभे केले जाणार आहेत. मुंबईत प्रत्येक मंडळाकडे मंडपासाठी कमी जागा आहे. बहुतांश मंडळ प्रवेशद्वारावर महिला अत्याचाराविरोधी संदेश देण्यावर भर देणार आहेत. प्रशस्त जागा असलेल्या मंडळांच्या मंडपात राजमहालांची प्रतिकृती तयार केली जात आहे. गिरगावचा राजाच्या वतीने इको फ्रेंडली आरास उभी केली जाणार आहे. डोंगरीच्या राजाच्या मंडपात राजमहाल बांधला जात आहे. भायखळा उत्सव मंडळाच्या वतीनेही कापडावर महलाचे डिझाईन तयार करत देखावा उभा केला जाणार आहे.
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने (गणेश गल्ली) उज्जैन महाकाल मंदिराची प्रतिकृती उभी केली जात आहे. अंधेरीचा राजा येथे राजस्थानमधील पटवा हवेलीची प्रतिकृती तयार केली जाणार आहे. ताडदेव सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने यंदा शीशमहालाचा देखावा उभा केला जात आहे. करी रोडच्या राजाच्या वतीने जगन्नाथ पुरी येथील मंदिराची प्रतिकृती उभी केली जात आहे.
दक्षिण मुंबईत काय?
१) दक्षिण मुंबईमधील पहिली सुतार गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळाची यंदाची गणेशमूर्ती अष्टभूज आहे. मूर्तीची उंची ३० फूट आहे. कुर्ला येथील क्रांतीनगर गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ५०वे वर्षे आहे. त्यांचा देखावा आकर्षक असणार आहे. सर्वोदय मंडळाचे पुढील ७५ वे वर्षे असून, मंडळाद्वारे सामाजिक संदेशातून संवेदना मांडल्या जाणार आहेत. संदेश नगर मंडळाकडून महिला सुरक्षेविषयी जनजागृती केली जाणार आहे.
२) मालाड पूर्वेकडील कुरार व्हिलेज, आप्पापाडा येथील बालगोपाल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा डोंगरचा महाराजा हा गणपती परिसरात प्रसिद्ध आहे. महिला व बालकांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करणारा देखावा सादर केला जाणार आहे. मंडळाचे अध्यक्ष अनिकेत वातकर, सचिव सागर नेवरेकर व खजिनदार विशाल रोहिमल व सागर कांबळे हे गणेशोत्सवात अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहेत.
इकोफ्रेंडली देखाव्यावर भर-
१) मुंबईतल्या बहुतांशी मंडळाच्या गणेशमूर्ती मंडपात दाखल झाल्या आहेत. आता मंडपातील देखावे उभारणीला सुरुवात झाली आहे. बहुतांश देखावे हे इकोफ्रेंडली आहेत. काही देखावे उभे करण्यासाठी लाल, सफेद अशा मोठ्या पडद्यांचा उपयोग केला जाणार आहे. काही ठिकाणी तिन्ही बाजूला पडदे उभे करत श्रीगणेशाभोवती फुलांची आरास केली जाणार आहे.
२) लालबागचा राजा आणि गणेशगल्ली येथील कमानी नेहमीप्रमाणे आकर्षक असणार असून, येथील कमानी उभ्या करण्याचे काम सुरू आहे. शिवाय भारतमाता सिनेमापासून लालबाग नाक्यापर्यंत रोषणाई करण्याचे कामही प्रगतिपथावर असून, लालबागच्या राजाच्या भक्तांसाठी मैदानात मंडप उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
३) लालबाग येथील एस. बी. क्रीडा मंडळाच्या वतीने अनंत चतुर्थीच्या दिवशी पुष्पवृष्टी सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. विशेष आकर्षण म्हणजे ५० फुटांवरून पुष्पहार गणरायाच्या चरणी अर्पण केला जाणार आहे.
४) अभ्युदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रोमन महालाची प्रतीकृती उभी केली जाणार आहे.