लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेशमूर्तींच्या विसर्जन सोहळ्याप्रसंगी गिरगाव चौपाटी येथे विनापरवानगी ड्रोन उडविणे पाच जणांना महागात पडले आहे. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदविले असून, तीन ड्रोन जप्त केले आहेत.
गणेशोत्सव काळात मुंबईत परवानगीशिवाय ड्रोन उडविण्यास बंदी होती. त्याबाबतचे आदेशही पोलिसांनी जारी केले होते. मात्र, विसर्जन सोहळ्याप्रसंगी काही जणांनी नियमांचे उल्लंघन करत गिरगाव चौपाटीवर विनापरवानगी ड्रोनद्वारे चित्रीकरण करणाऱ्यांविरूद्ध पोलिसांनी कारवाई केली. त्यात तीन ड्रोन जप्त करण्यात आले. तसेच ड्रोन उडविणाऱ्या पाच व्यक्तींविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २२३ व ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
यशस्वी शोधमोहीम-
१) त्यापाठोपाठ गिरगाव परिसरात हरवलेल्या ५८ व्यक्तींचा शोध घेऊन त्याची कुटुंबीयांशी भेट घालून दिली.
२) त्यात २ ते १७ वर्ष वयोगटातील ३९ लहान मुले, ज्येष्ठांसह १२ व्यक्तींचाही समावेश आहे.