Join us

‘श्रीगणेशा’४ महिने आधीच; गणेशोत्सवासाठी पालिका कर्मचारी, अधिकारी झटून करतात काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 9:29 AM

दरवर्षी गणेशोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडतो. विसर्जनाची तयारीही चोख असते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दरवर्षी गणेशोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडतो. विसर्जनाची तयारीही चोख असते. विसर्जनानंतर चौपाट्यांची स्वच्छताही वेगाने होते. दहा दिवसांचा हा उत्सव कोणतेही विघ्न न येता पार पडावा म्हणून मुंबई महापालिका प्रशासन उत्सवापूर्वी चार महिने झपाटून काम करत असते. 

सामान्य कर्मचाऱ्यांचा सहभाग तर असतोच, परंतु अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विभाग अधिकारी स्तरावरील अधिकारीही पूर्ण झोकून देत योगदान देतात. नेहमीची प्रशाकीय कामे सांभाळताना  उत्सवाशी निगडित बारीक-सारीक बाबींचा आढावा घेण्याचे काम सातत्याने सुरू असते.

मूर्तिकार कार्यशाळेत मूर्ती बनवण्यास सुरुवात करतात, तेव्हापासून प्रशासकीय स्तरावर उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला जातो. अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त आणि विभाग अधिकारी काम करत असतात. यंदा उपायुक्त म्हणून उत्सवाच्या तयारीची जबाबदारी प्रशांत सकपाळे यांच्याकडे आहे. सर्वात आधी गणेशोत्सव समितीसोबत अनेकदा बैठका  होतात. 

समितीच्या माध्यमातून सार्वजनिक मंडळांच्या अडचणी जाणून घेतल्या जातात. खड्ड्यांविषयी तक्रारी, मूर्तीचे आगमन-विसर्जन मार्गावरील अडचणी यांची माहिती घेतली जाते. त्यानंतर संबंधित विभाग अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली जाते. त्यानंतर अडचणी दूर करण्यासाठी काम सुरू होते. मंडळांना कोणत्या सुविधा पुरवायच्या, वीज पुरवठ्याबाबत बेस्टसोबत समन्वय कसा साधायचा, याचा आढावा घेतला जातो. 

काही वेळेस विलंब होतो...

मंडळांना परवानग्या देण्याचा मुख्य मुद्दा असतो. काही अटी मंडळांना जाचक वाटत असतील तर निराकरण केले जाते. उत्सवापूर्वी परवानग्या झटपट कशा मिळतील, यादृष्टीने प्रयत्न सुरू होतात. मात्र अनेकदा परवानग्या देण्यास विलंब होतो, अशा मंडळांच्या तक्रारी असतात. प्रशाकीय बाबी, मंडळांच्या अर्जातील त्रुटी आदी कारणांमुळे काही वेळेस विलंब होतो, असे संगितले जाते.

खड्ड्यांविना कृत्रिम तलाव-

कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यासाठी प्रशासन दरवर्षी प्रयत्न करत असते. यंदा एक अनोखा प्रयोग करण्यात आला. कृत्रिम तलावासाठी खड्डा खोदणे कसे टाळता येईल, यावर भर देण्यात आला आहे. खड्डा न खोदता अलगद वरच्या वर कृत्रिम तलावाची निर्मिती करण्याचा प्रयोग केला. दीड दिवसांच्या गणेश विसर्जनापासून दिवसापर्यंत कर्मचारी आणि अधिकारी उत्सवासाठी राबताना दिसतात. 

विशेष जबाबदारी-

घनकचरा विभागातील कर्मचारी विशेष कौतुकास पात्र ठरतात. त्यांच्या नेहमीच्या कामाच्या वेळेतच त्यांच्यावर चौपाट्यांवरील स्वच्छतेची कामे दिली जातात. त्यांना निर्धारित वेळेपेक्षा जास्त काम दिले जात नाही.

टॅग्स :मुंबईनगर पालिकागणेशोत्सव 2024