गणेशभक्त झाले पर्यावरण सजग! ८० हजारांवर मूर्तींचे कृत्रिम तलावांत विसर्जन, अनंत चतुर्दशीसाठी पालिका सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 09:34 AM2024-09-16T09:34:41+5:302024-09-16T09:36:32+5:30
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मुंबई महापालिकेच्या आवाहनाला गणेशभक्तांनी यंदा सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मुंबई महापालिकेच्या आवाहनाला गणेशभक्तांनी यंदा सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा गणेशमूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम विसर्जन स्थळांची व्यवस्था पालिकेने केली होती. सातव्या दिवसापर्यंत मुंबईकरांनी ८० हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांत केले आहे. मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
विसर्जनावेळी वाहने चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत, तसेच विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, यासाठी किनाऱ्यांवर ४७८ स्टील प्लेट, तर छोट्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ४३ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ७६१ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात केल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली. हार, फुले आदी निर्माल्य जमा करण्यासाठी १६३ निर्माल्य कलशांसह २७४ वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
‘भरती-ओहोटीची वेळ पाहून करा विसर्जन’-
१) १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी समुद्रात सकाळी ११:१४ वाजता ४.५४ मीटरची भरती, सायंकाळी ५:२२ वाजता ०.८६ मीटरची ओहोटी, तर रात्री ११:३४ वाजता ४.३९ मीटर उंचीची भरती असेल.
२) १८ सप्टेंबरला पहाटे ५:२७ वाजता ०.४८ मीटरची ओहोटी, तर सकाळी ११:३७ वाजता ४.७१ मीटरची भरती असेल.
३) या भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.