Join us  

विसर्जनासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’; अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांकडून विशेष सुरक्षा व्यवस्था 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 9:25 AM

लाडक्या गणरायाला आज भक्तिभावाने निरोप दिला जाणार आहे. विसर्जन निर्विघ्न पार पाडावे यासाठी मुंबई पोलिसांनी सर्व तयारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लाडक्या गणरायाला आज भक्तिभावाने निरोप दिला जाणार आहे. विसर्जन निर्विघ्न पार पाडावे यासाठी मुंबई पोलिसांनी सर्व तयारी केली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर येतात. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अडीच हजार वाहतूक पोलीस महत्त्वाच्या मार्गावर तैनात असणार आहेत. इस्ट-वेस्टची कनेक्टिव्हिटी सुरू राहण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर केला आहे. नवी मुंबईतून मुंबई विमानतळापर्यंत ‘ग्रीन कॉरिडॉर’ असणार आहे. 

सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनीही नागरिकांना वाहतूक नियमांचे आणि सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कुंभारे यांनी सांगितले की, डिजिटल मॅपिंग करत, ज्यात गणपती विसर्जन कुठल्या मार्गावरून होत आहे. वाहतूक मार्गात काय बदल करण्यात आले आहे, याची माहिती दिली आहे.  

प्रत्येक प्रादेशिक विभागाची डिजिटल क्लिप बनवून ती शेअर करण्यात आली आहे. प्रत्येक रोड स्कॅनिंग करून त्यावरील खड्डे बुजवून घेतले आहेत. तसेच रस्त्यांमध्ये गाडी बिघडली, अडकली तर क्रेन असणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, प्रवास सुखकर व्हावा या अनुषंगाने ग्रीन काॅरिडॉर केला असल्याचे कुंभारे यांनी सांगितले.

१) ग्रीन कॉरिडॉरमुळे नवी मुंबईहून अटल सेतूद्वारे येणारी वाहने पी. डीमेलो रोडद्वारे सीएसएमटीच्या दिशेने जातील. सीएसएमटीहून ही वाहने मंत्रालयमार्गे मरीन ड्राइव्ह करत पुढे कोस्टल रोडच्या दिशेने जातील.

२) कोस्टल रोडहून पुढे वांद्रे वरळी सी-लिंकमार्गे, पश्चिम द्रूतगतीमार्गे मुंबई विमानतळाला जाता येणार आहे. ६ सप्टेंबर ते १८ सप्टेंबरपर्यंत कोस्टल रोड (धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) वाहतुकीसाठी २४ तास खुला ठेवण्यात आला आहे. 

असा असणार ग्रीन कॉरिडॉरचा मार्ग...

१) पूर्व मुक्त मार्ग, अटल सेतूकडून दक्षिण मुंबईमार्गे उत्तर मुंबईकडे जाण्यासाठी पूर्व मुक्त मार्ग पी. डिमेलो मार्ग कल्पना जंक्शन  सीएसएमटी जंक्शन-महापालिका मार्ग-मेट्रो जंक्शन अशा मार्गिकेचा वापर करून कोस्टल रोडपर्यंत यावे. 

२) उत्तर मुंबईकडून दक्षिण मुंबईमार्गे पूर्वमुक्त मार्ग, अटल सेतूकडे जाण्यासाठी वाहनचालकांनी कोस्टल रोड दक्षिण वाहिनी प्रिन्सेस स्ट्रीट- श्यामलदास जंक्शन- श्यामलदास मार्ग मेट्रो जंक्शन पालिका मार्ग - सीएसएमटी जंक्शन-भाटीया बाग जंक्शन, कल्पना जंक्शन - पी. डिमेलो मार्ग-पूर्व मुक्त मार्ग, अटल सेतू या दक्षिण वाहिनीचा वापर करावा, अशा सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.

‘या’ पुलांवरून जाताना काळजी घ्या...

१) मुंबईतील घाटकोपर रेल ओव्हर पूल, करीरोड रेल ओव्हर पूल,  चिंचपोकळी रेल ओव्हर पूल, भायखळा रेल ओव्हर पूल, मरिन लाइन्स रेल ओव्हर पूल, सॅण्डहर्स्ट रोड रेल ओव्हर पूल, फ्रेंच रेल ओव्हर पूल, केनडी रेल ओव्हर पूल, फॉकलन्ड रेल ओव्हर पूल, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर पूल, प्रभादेवी- कॅरोल रेल ओव्हर पूल, दादर टिळक रेल ओव्हर या १२ धोकादायक पुलांवरून जाताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

२) धोकादायक पुलावरून गणेश विसर्जन मिरवणूक निघताना जुन्या तशाच धोकादायक पुलावरून १०० पेक्षा अधिक व्यक्ती विसर्जन मिरवणुकीवेळी जाणार नाहीत. 

३) विसर्जन मिरवणूक जुन्या तसेच धोकादायक पुलावर थांबणार नाही. याची काळजी घेण्यात यावी,  तसेच ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये, अशा सूचनाही पोलिसांनी दिल्या आहे.

टॅग्स :मुंबईगणेशोत्सव 2024मुंबई पोलीस