लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : यंदा दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी गणेशभक्तांनी पर्यावरणाचे संवर्धन जपण्याचा प्रयत्न केला. सोमवारी पहाटे ३ पर्यंत दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन जल्लोषात झाले. सार्वजनिक आणि घरगुती मिळून तब्बल ६६ हजार ३३९ गणेशमूर्ती विसर्जित केल्या. यामधील जवळपास ३० हजारांहून अधिक ४५ टक्के लोकांनी कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याची माहिती पालिकेने दिली. मुंबई गणेशभक्तांचा कल हळूहळू कृत्रिम तलावांकडे वाढत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ही जमेची बाजू असल्याचे मत पालिकेने व्यक्त केले.
पीओपीच्या गणेशमूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. त्यामुळे समुद्रजीवाला धोका वाढतो. त्यामुळे पीओपीच्या गणेशमूर्तीऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करा आणि कृत्रिम तलावात त्याचे विसर्जन करा, असे आवाहन पालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घराघरांत बाप्पाची प्रतिष्ठापना करणाऱ्या भक्तांना केले. पालिकेने २०० हून अधिक कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. मागच्या काही वर्षांपासून कृत्रिम तालावांसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या ११ वर्षांत कृत्रिम तलावातील गणेश विसर्जनाच्या प्रमाणात तब्बल ३७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पहाटे ३ पर्यंतचे विसर्जन-
१) सार्वजनिक- ४२०
२) घरगुती- ६५,८९४
३) हरितालिका- २५
एकूण- ६६,३३९
कृत्रिम तलावात विसर्जन -
१) सार्वजनिक- २५१
२) घरगुत - ३०,२४१
३) हरितालिका- २०
एकूण- ३०,५१२