Join us  

पावसाच्या साक्षीने बाप्पाला भावपूर्ण निरोप...! दीड दिवसाच्या ३८ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 9:35 AM

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या अशा जयघोषात आणि साश्रुनयनांनी मुंबईकर गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या गणपतींना रविवारी निरोप दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या अशा जयघोषात आणि साश्रुनयनांनी मुंबईकर गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या गणपतींना रविवारी निरोप दिला. रात्री ९ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार ३८ हजार ०९४ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. विसर्जन सोहळ्यावर काही ठिकाणी पावसानेही अभिषेक केला. 

वाजत गाजत, ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात शनिवारी घरोघरी गणरायाचे आगमन झाले. दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागेल, अशी हुरहूर भक्तांच्या मनात रविवार सकाळपासून होती. पण अखेर तो क्षण आलाच. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, लाडू-मोदक घेऊन या अशा घोषात भाविकांनी सहकुटुंब गणरायाला निरोप दिला. विसर्जनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता, तर पालिकेचे कर्मचारीही तैनात होते. निर्माल्य संकलित करण्यासाठी पालिकेने वेगळी व्यवस्था केली होती.

लोकल भरल्या भाविकांनी-

सुट्टी असूनही गणेशभक्तांमुळे लोकलमध्ये गर्दीचे चित्र होते. त्यात बहुसंख्य लोक दीड दिवसाचा गणपती विसर्जन होण्यापूर्वी नातेवाईकांच्या घरी जाण्यासाठी धावपळ करत होते. त्यामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा सर्वच रेल्वे मार्गावर सुटीच्या दिवशीही वर्दळ वाढल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :गणेशोत्सव 2024मुंबईनगर पालिका