लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घराघरांमध्ये, मंडपांमध्ये विराजमान झालेले गणराय आणि त्यांच्या पाठोपाठ आलेल्या माहेरवाशीण गौराईंमुळे सध्या मुंबईत उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण आहे. एकीकडे हा उत्सव आता शिगेला पोहोचत असताना बुधवारी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींना जडअंत:करणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला,’ अशा घोषणांनी चौपाट्या आणि कृत्रिम तलावांची ठिकाणे गजबजून गेली होती. रात्री उशिरापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरू होता.
बुधवारी दुपारपासून, त्यातही सायंकाळनंतर घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांत विसर्जनाची लगबग सुरू झाली. अखेरची आरती झाल्यानंतर मूर्ती विसर्जनासाठी बाहेर पडल्या. ढोल-ताशे कडाडले, लेझीमचा झंकार निनादला, गुलालाची उधळण झाली, मंगलमूर्तीची गजर झाला आणि सोहळा रंगला.
रात्री ९ वाजेपर्यंत झालेले विसर्जन-
१) सार्वजनिक -२१३
२) घरगुती -१४१५२
३) हरतालिका - १६
एकूण- १४३८१
यापैकी कृत्रिम तलावात झालेले विसर्जन-
१) सार्वजनिक -८०
२) घरगुती- ६४७४
३) हरतालिका- १२
एकूण - ६५६०
कृत्रिम तलावांना प्रतिसाद-
१) अनेक ठिकाणी घरगुती मूर्तींचे विसर्जन विभागातील किंवा जवळच्या विभागातील कृत्रिम तलावांत करण्यात आले.
२) विसर्जनासाठी बाहेर पडलेल्या मूर्तींमध्ये सार्वजनिकपेक्षा घरगुती मूर्तींची संख्या जास्त होती.
३) अनेकांच्या खासगी वाहनांतून बाप्पा विसर्जनासाठी रवाना होत असताना रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक भक्तिभावाने हात जोडत असल्याचे पाहायला मिळाले.