चतुर्थीच्या पूर्वसंध्येला खरेदीला उधाण; फुले, फळे, प्रसाद, सजावट साहित्याला मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 10:07 AM2024-09-07T10:07:55+5:302024-09-07T10:10:19+5:30

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळ, दादर मार्केट आदी भागांत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले.

in mumbai ganesh mahotsav 2024 shopping spree on the eve of chaturthi demand for flowers fruits and offerings decoration materials  | चतुर्थीच्या पूर्वसंध्येला खरेदीला उधाण; फुले, फळे, प्रसाद, सजावट साहित्याला मागणी 

चतुर्थीच्या पूर्वसंध्येला खरेदीला उधाण; फुले, फळे, प्रसाद, सजावट साहित्याला मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळ, दादर मार्केट आदी भागांत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. फळे, फुले, हार, केळीची पाने, विड्याची पाने, प्रसादासाठी विविध प्रकारचे मोदक, पंचखाद्य यासह सजावटीच्या साहित्यांची त्यांनी खरेदी केल्याचे पाहायला मिळाले. 

गणेशोत्सवामुळे अनेक जण दुपारीच कार्यालयीन काम आटपून खरेदीसाठी आले होते. क्रॉफर्ड मार्केट येथील बाजारात रंगीबेरंगी प्लास्टिकची फुले, त्यांच्या माळा, पानांच्या वेली, गालिचे, थर्माकोलवर चिकटविलेली फुलांची आरास, तोरणे तसेच मोर पिसे यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. पॉटमध्ये सजवलेली फुलेही ग्राहकांच्या पसंतीस उतरत होती. घरगुती गणपतीच्या आरासासाठी विविध प्रकारचे विद्युत दिवे, माळा यांना मागणी होती. मागील पंधरा दिवसांपासूनच ही खरेदी सुरू झाली होती. यंदा बाजारात प्रकाश माळांचे विविध नवीन प्रकारही आले होते. ‘गणपती बाप्पा मोरया’ लिहिलेले लाइट, तसेच विजेच्या माळांनी सजलेली फुले, फुलपाखरांचे तोरण यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

यंदा होलसेल विक्रीला चांगला प्रतिसाद राहिला. मात्र किरकोळ विक्री काहीशी मंदावली. अनेकांचे अद्याप पगार झाले नसल्याने त्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली. त्यातून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा व्यवसाय २० टक्क्यांनी कमी झाला. - प्रज्वल पाटील, व्यावसायिक, लोहार चाळ

Web Title: in mumbai ganesh mahotsav 2024 shopping spree on the eve of chaturthi demand for flowers fruits and offerings decoration materials 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.