Join us  

मुंबईकरांचा रविवार ठरला दर्शनवार; लालबाग, परळ, गिरगाव येथे अलोट गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 9:45 AM

मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उभारलेले आकर्षक आणि मोठमोठे देखावे पाहण्यासाठी पहिल्याच रविवारी गणेशभक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उभारलेले आकर्षक आणि मोठमोठे देखावे पाहण्यासाठी पहिल्याच रविवारी गणेशभक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली, त्यात लालबाग, परळ, भायखळा, गिरगाव, खेतवाडी, मुंबई सेंट्रल, वडाळा या भागांतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये जनसागरच लोटल्याचे पाहायला मिळाले.

लालबाग, गणेशगल्ली येथील मंडळांनी उभारलेल्या आकर्षक कमानी, भारतमाता सिनेमापासून लालबाग नाक्यापर्यंत करण्यात आलेली विद्युत रोषणाई आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी उत्साही तरुण मंडळी धडपड सुरू होती. तर आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसलेली लहान मुले 'गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया'च्या घोषणा देत होती. 

गणेशगल्ली येथील उज्जैन महाकाल मंदिराची प्रतिकृती शिवभक्तांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. वडाळा येथे सोन्याच्या दागदागिन्यांनी मढवलेली गणेशमूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने भाविक वाहने घेऊन आल्याने झालेली वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांना बरीच कसरत करावी लागली.

बाप्पांचे महाल ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू-

१) गिरगाव परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती.

२) गिरगावमधील मंडळाची इको फ्रेंडली आरास, डोंगरी येथील राजमहाल, तर भायखळा येथील कापडावरील महालाची डिझाइन असलेली सजावट पाहण्यासाठी गर्दी होत होती.

३) चिंचपोकळी येथील जगन्नाथ पुरी येथील मंदिराची प्रतीकृती, खेतवाडीतील ११ व्या गल्लीमधील ४० फुटांपेक्षा उंच बाप्पाचे रूप पाहून भाविक थक्क झाले होते. त्याचबरोबर अनेकांनी आपल्या नातेवाइकांच्या घरी गणेशाचे दर्शन घेतले. त्यामुळे मुंबापुरातील वातावरण भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :गणेशोत्सव 2024मुंबईगणेश चतुर्थी २०२४