लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेशाचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र उत्साह, जल्लोषाने वातावरण भारावून गेले आहे. प्रत्येक जण आपापल्यापरीने गणेशाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. खासकरून सोशल मीडियावरही प्रत्येक जण गणरायांप्रती असलेला भावभक्तीचा जागर करताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर बाप्पाच्या आगमनाच्या पोस्ट, फोटो, सजावट यांची एकच क्लिक-क्लिक सुरू आहे.
फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून गणरायाचे फोटो व्हायरल केले जात आहेत. तसेच घरगुती, सार्वजनिक गणेशाच्या आरती, दर्शनासाठी आग्रहाचे निमंत्रण दिले जात आहे.
कोकणात गेलेले मुंबईकर कोकणातल्या मोरयाच्या सुंदर आठवणी फोटोंसह शेअर करत आहेत. मुंबईतील दादर मार्केटमधील फुले-फळे, सजावटीचे साहित्य, तोरणांनी अन् गर्दीने भरलेला माहोलही फोटोच्या रूपाने सोशल मीडियावर धाे धाे वाहत आहे.
मोदक, पेढ्यांऐवजी मदत करा-
१) पर्यावरणस्नेही गणेशभक्तांनी गणपती येण्याच्या आधीच गुगलची मदत घेऊन मूर्ती कशी साकारायची, याचे धडे घेतल्याचे सोशल मीडियाच्या पोस्टमधून दिसत आहे.
२) सोशल मीडियामुळे विविध ठिकाणी बाप्पाच्या दर्शनरांगांची काय स्थिती आहे, याचीही माहिती कळते, असेही तरुणाईचे मत आहे. टी शर्ट, स्टिकर्स, ढोल-ताशांच्या ऑर्डर्स घेणारे नवे गटांचे संपर्क क्रमांकही गुगलवरून काढले जात आहेत. बाप्पाला मोदक, पेढ्यांचा प्रसाद आणण्याऐवजी या पैशांची देणगी गरीब मुलांना द्या, वह्या-पुस्तकांची भेट द्या, असे सांगितले जात आहे.