आई, बघ देवबाप्पा घरी आले...! घरोघरी लहान मुलांची उत्सुकता पोहोचली शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 11:51 AM2024-09-07T11:51:39+5:302024-09-07T11:53:24+5:30
आपला लाडका बाप्पा घरी येणार म्हणून लहान मुलांची उत्सुकता अनेक दिवसांपासून शिगेला पोहोचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आपला लाडका बाप्पा घरी येणार म्हणून लहान मुलांची उत्सुकता अनेक दिवसांपासून शिगेला पोहोचली होती. शुक्रवारी अनेकांनी गणरायाच्या मूर्ती मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून घरी नेल्या. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया’चा एकच जयघोष सर्वत्र पाहायला मिळाला. घराजवळ पोहोचल्यावर लहान मुलांनी ‘आई देवबाप्पा आले...!’ अशी आरोळी दिल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर बाप्पाची आरती ओवाळून मूर्ती घरात नेण्यात आली.
गणेशमूर्ती घरांमध्ये नेण्यासाठी शुक्रवारी लालबाग, परळ भागात भाविकांनी गर्दी केली होती. शाडूच्या मातीच्या एक, दीड फुटाच्या छोट्या गणेशमूर्ती, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दोन ते तीन फुटांपर्यंत हिरे, माणिक, अशी रत्न जाडीत आकर्षक बाप्पाच्या मूर्ती नेताना लोकांचा उत्साह गगनात मावत नव्हता. अधून-मधून पावसाच्या सरी हजेरी लावत असतानाही त्यांचा उत्साह कुठीही कमी पडत नव्हता.
वेगवेगळ्या गणेशमूर्तींना भाविकांची मागणी असते. यावर्षी मूर्तींच्या किमतींमध्ये विशेष वाढ झाली नसली तरी शाडूच्या मूर्तींची मागणी थोडीशी वाढली आहे. - किरण जाधव, गणेशमूर्ती विक्रेते
गेली पाच वर्षे आम्ही शाडूची मूर्ती नेत आहोत. तिचे विसर्जन आम्ही घरीच कुंडीमध्ये करतो. त्यामुळे आमचा बाप्पा वर्षभर आमच्या सोबतच राहतो. - विद्या पाटील, भाविक