Join us  

भाविकांनो, या १३ पुलांवरून जरा जपून...! पूल धोकादायक झाल्याने मिरवणुका नेताना गर्दी करू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 10:33 AM

पालिकेच्या हद्दीतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १३ पूल धोकादायक स्वरूपाचे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पालिकेच्या हद्दीतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १३ पूल धोकादायक स्वरूपाचे आहेत. काही पुलांच्या डागडुजीची कामे सुरू असून, काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविकांनी गणेशोत्सवात गणेशाच्या आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. 

२०१८ मध्ये अंधेरीतील गोखले पूल कोसळून दोघांचा, तर २०१९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या सात जणांचा बळी गेला होता. त्यानंतर मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे मुंबईतील सर्व ३४४ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक छोटी-मोठी दुरुस्ती, तर अतिधोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे धोरण आखण्यात आले. मात्र, काही जुन्या पुलांचा वापर अजूनही केला जात आहे. गणेशोत्सवात पुलांचा वापर करताना खबरदारी बाळगावी, यासाठी पालिकेने त्यांची यादी जाहीर केली आहे. या १३ पुलांवर एकावेळेस अधिक वजन होऊ नये, यासाठी भाविकांची जास्त गर्दी करू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

त्याचबरोबर पालिका व मुंबई पोलिस यांच्यातर्फे वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सूचना व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे ही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

या पुलांवरून काळजी घ्या- मध्य रेल्वे : घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज, करी रोड रेल्वे ओव्हर ब्रिज, आर्थर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज, चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रिज, भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज, शिव (सायन) स्टेशन रेल्वे ओव्हर ब्रिज.

पश्चिम रेल्वे : मरिन लाइन्स रेल्वे ओव्हर ब्रिज, सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलॅन्ड रेल्वे ओव्हर ब्रिज, (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये), महालक्ष्मी स्टेशन रेल्वे ओव्हर ब्रिज, प्रभादेवी-कॅरोल रेल्वे ओव्हर ब्रिज, दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे ओव्हर ब्रिज.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामध्य रेल्वेपश्चिम रेल्वेगणेशोत्सव