लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेशोत्सवात भाविकांना रात्रीच्या वेळेत बाप्पाचे दर्शन घेता यावे, यासाठी बेस्ट प्रशासनाने रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत २४ विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीत नऊ मार्गांवर या सेवा सुरू करण्यात येणार आहेत.
लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी, काळाचौकी या भागांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी मुंबईच्या विविध भागांतून भाविक येतात. रात्रीच्या वेळी त्यांची वाहतुकीची गैरसोय होऊ नये, यासाठी ही विशेष सेवा सुरू करण्यात येत आहे.
दक्षिण मुंबईतून उत्तर-पश्चिम मुंबईकडे गिरगाव, लालबाग, परळ, चेंबूरमार्गे बसमार्ग क्र. ४ मर्या., ७ मर्या., ८ मर्या., ए-२१. ए-२५, ए-४२, ४४, ६६, ६९, ५१ या मार्गावर रात्री विशेष बस फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.