...तर प्रतिखड्डा दोन हजार दंड; मंडपासाठी खोदकाम न करण्याचे पालिकेचे मंडळांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 10:42 AM2024-09-05T10:42:45+5:302024-09-05T10:44:53+5:30

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे.

in mumbai ganeshotsav 2024 bmc has undrtaken campaign to plug potholes to avoid inconvinience to devotees | ...तर प्रतिखड्डा दोन हजार दंड; मंडपासाठी खोदकाम न करण्याचे पालिकेचे मंडळांना निर्देश

...तर प्रतिखड्डा दोन हजार दंड; मंडपासाठी खोदकाम न करण्याचे पालिकेचे मंडळांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खोदले आहेत. त्यामुळे मंडपासाठी रस्त्यांवर खड्डे खोदू नयेत, अशी सूचना पालिकेने केली आहे. मंडपासाठी खड्डे खोदल्याचे दिसल्यास प्रतिखड्डा दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. 

पालिकेने गणेशोत्सव माहिती पुस्तिकेचे नुकतेच प्रकाशन केले आहे. त्यात पालिकेच्या मार्गदर्शक सूचनांसह कृत्रिम तलावांची माहिती, भरती व ओहोटीच्या वेळा, तसेच रस्त्यांवर तात्पुरते बांधकाम उभारण्यास परवानगी देण्याबाबतच्या धोरणातील तरतुदी दिल्या आहेत. उत्सव काळात मंडळांचे मंडप विविध जाहिरातींनी भरलेले दिसतात. त्यासाठी देखील पालिकेने सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रतिबंधित असलेल्या वस्तूंच्या जाहिराती करण्यास मनाई आहे. तसेच मंडपाच्या केवळ १०० मीटर परिसरातील जाहिरातींना परवानगी दिली जाईल, असे नमूद केले आहे. सक्षम प्राधिकरणाने ठरविलेल्या  आवाजाच्या मर्यादेच्या पातळी संदर्भातील सूचनांचे पालन मंडळांकडून होणे आवश्यक असल्याचे ही पुस्तिकेत स्पष्ट करण्यात आले आहे.

गर्दीचे व्यवस्थापन बंधनकारक-

१) रेल्वे स्थानक, सार्वजनिक बस स्थानके, ऑटोरिक्षा, टॅक्सी थांबे, मोठी रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था यांच्या परिसरात मंडप उभारण्याची परवानगी देताना विभागीय सहायक आयुक्तांनी वाहने आणि पादचारी ये-जा करू शकतील, याकरिता जागा राखून ठेवावी.

२) नागरिकांच्या माहितीकरिता पादचारी आणि वाहनांच्या मार्गाचा तपशील दर्शविणारा नकाशा मंडपावर योग्यरीत्या प्रदर्शित करावा.

३) प्रत्येक मंडळाकडे गर्दीचे व्यवस्थापन करण्याची योजना, आराखडा हवा आणि हा आराखडा मंडपाच्या प्रवेशद्वारावर प्रदर्शित करावा.

इथे नोंदवा तक्रार-

मंडप, ध्वनी प्रदूषण आदी तक्रारी नागरिकांना करता याव्यात, यासाठी प्रत्येक विभागाच्या सहायक आयुक्तांद्वारे तक्रार निवारण अधिकारी नेमले जातील. या अधिकाऱ्यांद्वारे तक्रारींच्या तत्काळ निवारणासाठी कार्यवाही केली जाईल. त्याचबरोब दूरध्वनी किंवा लेखी स्वरूपात नागरिकांना तक्रारी नोंदवता येणार आहेत.

Web Title: in mumbai ganeshotsav 2024 bmc has undrtaken campaign to plug potholes to avoid inconvinience to devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.