लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेशोत्सवाला शनिवारी प्रारंभ होणार असला तरी त्या अगोदरच या उत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्ती मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून आपल्या मंडपात नेण्यास सुरुवात केली आहे. आगमन सोहळ्यात डीजेचा दणदणाट आणि ढोल-ताशांचा गजर होत असल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनि प्रदूषण होत आहे. मात्र, त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे डीजेचा आवाज मर्यादेत ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ढोल-ताशा, डीजेचा वापर-
१) आपल्याकडे वर्षभर विविध सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हे उत्सव साजरे करत असताना ढोल-ताशा पथक आणि डीजेचा वापर केला जातो.
२) अलिकडे तर अत्याधुनिक वाद्यांचाही वापर केला जाऊ लागला आहे. मात्र नकळत या अतिरिक्त आवाजामुळे नागरिकांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.
कानातील नसांना दुखापत-
सतत मोठमोठ्याने आवाज कानावर आदळल्याने त्रास होत असल्याचे काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. संघटनेने हेडफोन वापरण्यासंदर्भातही इशारा दिला आहे.
२०५० पर्यंत जगातील १०० कोटी लोक बहिरे होतील आणि त्यांचे वय १२ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असेल, असा इशारा दिला होता. हेडफोन वापरल्यामुळे कानाचा बाहेरील पाकळ्या लाल होऊन दुखू लागतात. हेडफोनमुळे कानातील नसांना दुखापत होऊन त्याचा श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कमी ऐकायला येते. त्याचप्रमाणे कालांतराने बहिरेपणा येण्याची शक्यता असते, असे म्हटले आहे.
ध्वनि प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होतो. यामध्ये उच्च रक्तदाब, मानसिक आरोग्याच्या तक्रारी चिडचिड होणे, झोपेच्या समस्या, हृदयाची धडधड वाढणे, श्रवण शक्तीवर त्याचा परिणाम होऊन कमी ऐकू येते. या वाद्यांबरोबर जोरात हॉर्न वाजवल्यामुळे रुग्णालयातील रुग्ण आणि शाळेतील मुलांना त्रास होतो. ध्वनि प्रदूषणामुळे मन एकाग्र होत नाही, लक्ष विचलित होण्यासारखे प्रकार घडतात. ८० डेसिबलपर्यंत आवाज चालू शकतो, मात्र १०० डेसिबलच्या पुढे आवाज असल्यास कानाचा पडद्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. - डॉ. श्रीनिवास चव्हाण, कान, नाक, घसा विभागप्रमुख, जे. जे. रुग्णालय