उकडीच्या मोदकाची ऑर्डर यंदा दुप्पट, महागाईची बसली नाही झळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 10:30 AM2024-09-06T10:30:12+5:302024-09-06T10:33:56+5:30
भाजीपाल्याच्या किमती रॉकेटसारख्या वर गेलेल्या असताना बाप्पांच्या आवडत्या उकडीच्या मोदकाला मात्र महागाईची झळ लागलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाजीपाल्याच्या किमती रॉकेटसारख्या वर गेलेल्या असताना बाप्पांच्या आवडत्या उकडीच्या मोदकाला मात्र महागाईची झळ लागलेली नाही. यंदा गूळ, साखर, तांदूळ पीठ अशा आवश्यक साहित्याचे भाव स्थिर असल्याने तयार मोदकांच्या दरात कोणतीही वाढ झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावर्षी लहान आकारांच्या मोदकाची किंमत प्रति नग २५ रुपये, तर मोठ्या आकारातील मोदक ३० ते ३५ रुपये आहे. विविध शहरांनुसार या किमतीत थोड्या फार प्रमाणात फरक पडत असला तरी आकारमानानुसार २५ ते ४० रुपयांपर्यंत त्याची विक्री होत आहे. साहित्याच्या किमतींत फारसा फरक न पडल्याने भाववाढ करण्यात आली नसून, त्यामुळे भक्तांकडून यंदा मागणी दुप्पटीने वाढली असल्याचे मोदक तयार करणाऱ्या महिला बचतगट व्यावसायिकांनी सांगितले.
याबाबत वनिता निकम म्हणाल्या, ‘नोकरदार महिलांना एकत्र मोठ्या संख्येने मोदक बनविणे शक्य नसते. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाल्याने मागील काही आठवड्यांपासून ऑर्डर घेणे बंद करावे लागले आहे.’
अमराठी भक्तांच्या ऑर्डर अधिक-
१) मराठी भक्तांसह आता अमराठी बांधवही बाप्पांचे स्वागत मोठ्या उत्साहात करतात. मात्र, अनेक अमराठी भक्तांना मोदक तयार करता येत नाहीत.
२) त्यामुळे बाप्पांच्या नैवेद्यासाठी मोदकांची ऑर्डर अमराठी भक्तांकडून अधिक येत असल्याचेही बचतगट महिला व्यवसायिकांनी सांगितले.
मोदकांचे प्रकार-
गहू पिठाच्या पातीमध्ये सारण टाकून तळलेले मोदक बनविले जातात. साखर आणि खोबरे भरून बनविलेले हे मोदक कुरकुरीत लागतात. सारणात मावा आणि केसर टाकून बनविलेल्या केसरी मोदकाची चव आबालवृद्ध अशा सर्वांच्याच पसंतीस उतरते.