Join us

‘आरे’तील गणेशोत्सव मंडळ यंदाही परवानगीच्या प्रतीक्षेत; ‘इको-सेन्सिटिव्ह झोन' वरून स्थानिकांची नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 11:54 AM

गणेशोत्सव जेमतेम पंधरवड्यावर आला तरी आरे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे यंदा दुसऱ्या वर्षी ‘आरे’तील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेशोत्सव जेमतेम पंधरवड्यावर आला तरी आरे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे यंदा दुसऱ्या वर्षी ‘आरे’तील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. यासंदर्भात मंडळांचे पत्रही स्वीकारण्यात आलेले नाही. लवकरात लवकर मंडप उभारण्यास परवानगी न मिळाल्यास आरे प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नवक्षितिज ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी दिला आहे. 

गोरेगाव येथील आरे परिसरात सुमारे ३५ ते ४० सार्वजनिक मंडळे आहेत. या मंडळांना मंडपाबरोबरच तात्पुरती वीजजोडणी आणि पोलीस परवानगीही मिळत नाही.  कोणत्याही शासकीय विभागात पत्र स्वीकारण्याचा नियम आहे; परंतु आरे प्रशासनाच्या कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडपाच्या परवानगीचे पत्र स्वीकारले जात नाही, याकडे कुमरे यांनी लक्ष वेधले आहे. 

लोकमान्य टिळक यांनी समाजात एकोपा निर्माण व्हावा, या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला; परंतु या उत्सवाला आरे  प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाचा फटका बसत आहे, असा आरोपही त्यांनी केला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपासाठी परवानगीकरिता मी आणि माझा सहकारी ४ ऑगस्टला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात गेलो होतो. 

पत्र घेण्यास नकार-

१) आम्ही तेथील संबंधित अधिकाऱ्यांना पत्र दिले असता त्यांनी ते घेण्यास नकार दिला.

२) आम्ही आरे पोलीस ठाण्यात परवानगी घेण्यासाठी गेलो असता त्यांनी आधी ‘आरे’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन या, मगच आम्ही परवानगी देतो, अशी भूमिका घेतल्याचे आरे कॉलनीतील आरंभ मित्रमंडळाचे जयेश भिसे यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाआरेगणेशोत्सव