Join us  

गणेशोत्सव मंडळांना खड्ड्यांची चिंता; पालिकेकडे खड्डे बुजवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 9:45 AM

गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपल्याने खड्ड्यांमुळे गणेश मंडळांची चिंता वाढली आहे.

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपल्याने खड्ड्यांमुळे गणेश मंडळांची चिंता वाढली आहे. ऑगस्टमध्ये अनेक मोठ्या मंडळांच्या गणेशमूर्तींचे मंडपांमध्ये आगमन होणार असल्याने ११ ऑगस्टपूर्वी खड्डे बुजवावेत, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुंबई पालिकेकडे केली आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रयत्नशील असली तरी पावसामुळे भरलेले खड्डे पुन्हा डोके वर काढत आहेत. या महिन्यात आणखी पाऊस अपेक्षित आहे, शिवाय ऑगस्टमध्येही काही प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे खड्ड्यांची संख्या आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. 

७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून गणेशमूर्ती परळ, लालबाग येथील कार्यशाळांमधून मंडपांत नेल्या जाणार आहेत. त्यापूर्वी खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे.

‘आगमन मार्ग कळवा’-

१) बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने गणेशोत्सव मंडळांनाही काही सूचना केल्या आहेत. मोठ्या गणेशमूर्तींच्या आगमनापूर्वी मंडळांनी महापालिकेचे विभागीय कार्यालय, तसेच स्थानिक पोलीस ठाण्याला आगमन मार्गाची माहिती द्यावी, असे मंडळांना सांगण्यात आले आहे. 

२)  गणेश मूर्ती ज्या मार्गावरून नेणार आहेत, त्या मार्गावर खड्डे आहेत का, झाडांच्या फांद्यांमुळे अडथळा निर्माण होत आहे का, याचा आढावा घ्यावा आणि संबंधित विभागांना माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकागणेशोत्सव