Join us  

गणेशोत्सव ४ दिवसांवर, ४० टक्के परवानग्या बाकी; पालिकेकडून १ हजार ७७३ परवानग्या मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 11:17 AM

गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असून मंडप, देखावे, बँड पथक सगळ्यांची जय्यत तयारी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असून मंडप, देखावे, बँड पथक सगळ्यांची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, ४० टक्के गणेशोत्सव मंडळांना पालिकेकडून परवानग्या मिळणे बाकी आहेत. पालिकेकडे मंडप परवानग्यांसाठी ३ हजार ५०७ अर्ज आले होते. त्यामध्ये ४७९ दुबार अर्ज आहेत. आतापर्यंत १ हजार ७७३ परवानग्या मंजूर झाल्या असून परवानग्यांची टक्केवारी ५८ टक्के आहे. अजूनही ४० टक्के परवानग्या प्रलंबित असल्याने गणेश मंडळांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, शनिवारी आणि रविवारी ही मंडप परवानग्यांची प्रक्रिया आम्ही सुरू राहणार असल्याने उर्वरित प्रक्रिया लवकर पूर्ण करू, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यंदा ६ ऑगस्टपासून मंडप परवानगीसाठी आवश्यक पालिकेच्या एक खिडकी प्रक्रियेला सुरुवात झाली. सरासरी अर्जाची संख्या ३ हजार २८ असून त्यापैकी ५८ टक्के म्हणजे १७०० हून अधिक अर्जांना पालिकेकडून परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सलग ५ वर्षे मंडप परवानगीसाठीच्या नियमांत पालिकेकडून बदल करण्यात आल्याने अनेक मंडळांकडून रस्ताही अर्ज करण्यात आले आहेत.

१) एकूण अर्ज -३५०७

२) वाहतूक विभागाकडे प्रलंबित- ३४०

३) पोलिसांकडे प्रलंबित अर्ज- ४५० 

४) दुबार अर्ज- ४७९

५) मंजूर अर्ज - १७७३

मंडळांना पुढील वर्षी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून केवळ परवानगीचे  ऑनलाईन नूतनीकरण करावे लागणार आहे.

विभाग पातळीवर समिती स्थापन-

१) गणेशोत्सव शांततेने साजरा करण्यासाठी पालिकेकडून योग्य काळजी घेतली जात असून या समन्वयासाठी पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये २४ समन्वय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

२) त्यात पालिकेचे सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी, पोलिस अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक श्रीगणेशोत्सव समन्वय समितीचे प्रतिनिधी तसेच इतर संबंधित खात्याचे अधिकाऱ्यांचा समावेश असतो.

टॅग्स :मुंबईनगर पालिकागणेशोत्सव