Join us

गरबाप्रेमींची कपड्यांसाठी 'जरा हटके' स्टाइलला पसंती; पारंपरिकप्रमाणे डिझायनर पेहराव बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 11:11 AM

नवरात्रीला अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले असताना दांडिया, गरबा प्रेमींनी 'जरा हटके' दिसण्यासाठी बाजारात पोषाख निवडीसाठी आता गर्दी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नवरात्रीला अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले असताना दांडिया, गरबा प्रेमींनी 'जरा हटके' दिसण्यासाठी बाजारात पोषाख निवडीसाठी आता गर्दी केली आहे. यंदा नेहमीची घागरा चोली किंवा चणिया चोली तर आहेच, पण त्याशिवाय गरबासाठी डिझाइन केलेले अनेक पेहरावही बाजारात आलेले दिसत आहेत.

सध्या साडी आणि घागरा दोन्हीवर सजणारी कच्छी एम्ब्रॉयडरीची रेडिमेड चोली नेहमीप्रमाणे यंदाही पसंतीस उतरत आहेत. विविध रंगांसह नक्षींमध्येही त्या उपलब्ध आहेत. गरब्याच्या घोळक्यात 'हटके लूक' देणाऱ्या पांढऱ्या कुर्ता आणि त्यावर रंगीबेरंगी जॅकेटही तरुण-तरुणींचे लक्ष वेधत आहे. उठावदार रंगांमध्ये उपलब्ध असलेले हे जॅकेट नवरात्रीनंतरही स्कर्ट किंवा जीन्सवर वापरले जात असल्याने त्याला मागणी वाढताना दिसते आहे.

कुर्त्याला आता मुलींचीही पसंती-

आता कुर्ता मुलांप्रमाणेच मुलींनाही विशेष आवडू लागला आहे. त्यातही कॉटन बांधणी, हाफ कुर्ता, शॉर्ट कुर्ता, लाँग कुर्ता, अनारकली कुर्ता अशा अनेक प्रकारातले कुर्ते सध्या बाजारात आहेत. राजस्थानी झलक असलेले कुर्ते उलांचा सध्या कल दिसतो आहे. राजस्थानी एम्ब्रॉयडरीच्या मोजडींनाही या दिवसांत मागणी वाढल्याचे दिसते आहे.

रिमिक्स स्टाइल खाते भाव-

१) घागरा किया डिझायनर स्कर्टसह क्रॉप टॉप स्टाइल ब्लाऊज हा पारंपरिक आणि आधुनिक अशा रिमिक्स स्टाइलमधला पोषाखही बाजारात भाव खाताना दिसत आहे. त्यासोबत धोती पैंट आणि कच्छी ज्वेलरीने सजण्याचाही मानस यंदा दिसतो आहे. 

२) धोती पॅटवर कमरपट्टा आणि हाफ कुर्ता, जॅकेट घालूनही वेगळा आऊटफिट करण्यात पसंती दिली जात आहे. यंदा एम्ब्रॉयडरी केलेल्या भरजरी ओढण्यांमधील वेगवेगळ्या डिझाईनही बाजारात उपलब्ध झाल्याचे कपडे व्यवसायिक माया कदम यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईनवरात्री