मुंबई : शहर आणि उपनगरांतील लहान-मोठ्या नाल्यांमधून उद्दिष्टांपेक्षा अधिक गाळ काढण्यात आला आहे; मात्र नालेसफाईनंतरही नाल्यांच्या काठावरील रहिवासी नाल्यात कचरा टाकत आहेत. वडाळा येथील नाल्याची सफाई केली होती; परंतु नाल्यात पुन्हा कचरा टाकल्याचे आढळून आल्याने तोही काढला आहे, असे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
इंद्रानगर तसेच वडाळा ट्रक टर्मिनस येथील न्यू म्हाडा ट्रान्झिट कॅम्प भागातील कोकरे नाल्याची पाहणी गुरुवारी पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी या नाल्यांतील गाळ, कचरा काढलेला नसल्याचा आरोप केला होता. त्यावर पालिकेने वरील स्पष्टीकरण दिले आहे.
कोकरे नाल्यातील गाळ आणि तरंगता कचरा २१ आणि २२ मे रोजी काढण्यात आला आहे, परंतु या नाल्यांमध्ये तरंगता कचरा आढळून आला असून, तोही त्वरित काढण्यात येत आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
मुंबईतील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता, याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, नाल्यांमधून किती गाळ काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून गाळ उपशाचे उद्दिष्ट दरवर्षी निश्चित केले जाते. त्यानुसार, वार्षिक उद्दिष्टांपैकी पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मेपर्यंत मोठ्या नाल्यांतील ७५ टक्के गाळ काढण्याचे उद्दिष्ट होते.
३१ मे पर्यंत विविध नाल्यांमधून १० लाख २२ हजार १३१ दशलक्ष टन इतका गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्यात म्हणजे १ जूनपासून नाल्यांमधून १५ टक्के काढण्याचे उद्दिष्ट आहे.
‘नदी, नाल्यात कचरा टाकू नका’-
१) पावसाळ्यापूर्वी विविध भागांतील लहान-मोठ्या नाल्यांतील गाळ काढला आहे; मात्र नाल्यांमध्ये आसपासच्या रहिवाशांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याचे आढळून येत आहे.
२) कचरा, राडारोडा नदी-नाल्यांत टाकल्यास पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन अतिवृष्टीच्या वेळी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.
३) हे एक प्रकारचे स्वत:हून ओढवून घेतलेले संकट ठरू शकते. त्यामुळे, नागरिकांनी नदी किंवा नाल्यात कचरा, राडारोडा टाकू नये, असे आवाहन प्रशासनाने पुन्हा केले आहे.
१ लाख १५ हजार ४७३ दशलक्ष टन गाळ उपसा- १ ते २१ जूनदरम्यान विविध नाल्यांमधून एकूण १ लाख १५ हजार ४७३ दशलक्ष टन इतका गाळ काढला आहे. तर, पावसाळ्यानंतर उर्वरित १०टक्के गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे, असे पालिकेने सांगितले.