गोराईतील कचऱ्याची विल्हेवाट लावणार कांजूर, देवनारमध्ये; ६ कोटींचा खर्च अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 11:04 AM2024-06-18T11:04:44+5:302024-06-18T11:05:58+5:30
गोराई येथील रिफ्युज ट्रान्सफर स्टेशनमधून जमा झालेला कचरा हटवण्याचा निर्णय घनकचरा विभागाने घेतला आहे.
मुंबई : गोराई येथील रिफ्युज ट्रान्सफर स्टेशनमधून जमा झालेला कचरा हटवण्याचा निर्णय घनकचरा विभागाने घेतला आहे. कांजूर आणि देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याची अंतिम विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यासाठी सुमारे सहा कोटींचा खर्च केला जात आहे.
मुंबईतील ६ हजार मेट्रिक टनांच्या कचऱ्यापैकी २ हजार मेट्रिक टन कचरा हा सहा ठिकाणी असणाऱ्या कचरा हस्तांतरण केंद्रांवर छोट्या वाहनांमधून जमा केला जातो. यानंतर मोठ्या वाहनांमधून डंपिंग ग्राऊंडवर नेऊन विल्हेवाट लावली जाते. मात्र वर्सोवा, गोराई, कुर्ला आणि महालक्ष्मी येथे असणाऱ्या कचरा हस्तांतरण केंद्रांच्या ठिकाणी जमा होणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते, शिवाय रोगराई पसरण्याचा धोका असतो. गोराई आरटीएसमध्ये दररोज ४०० मेट्रिक टन कचरा गोळा होतो. कचऱ्याचे विभाजन सुधारण्यासाठी पालिकेने या आरटीएस केंद्रामध्ये काही सुधारणाही केल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून येथील कचऱ्याचे वर्गीकरण केले
जाते.
असे होते कचऱ्याचे वर्गीकरण-
कचऱ्याचे वर्गीकरण घनकचरा तात्पुरता जमा करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने ट्रान्स्फर स्टेशन प्रक्रिया केंद्र उभारली. महालक्ष्मी, कुर्ला, वर्सोवा आणि गोराई येथे पालिकेने ही केंद्रे उभारली आहेत. मुंबईतील कचरा सध्या देवनार आणि कांजूरमार्ग कचरा प्रक्रिया युनिटमधील लैंडफिलमध्ये टाकला जातो. पालिकेच्या प्रभागांमधून जो घनकचरा मिळतो तो येथे थेट टाकण्यापूर्वी तो कचरा ट्रान्स्फर स्टेशन येथे जमा केला जातो. त्यानंतर कालांतराने योग्य वर्गीकरण केलेला कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो.
'२०३० पर्यंत कचरामुक्त मुंबई'चे उद्दिष्ट-
कचरामुक्त मुंबईसाठी महापालिकेने २ ऑक्टोबर २०१७ पासून सोसायट्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले. यामध्ये २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि १०० किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या इमारती-आस्थापनांना ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच २०३० पर्यंत कचरामुक्त मुंबई हे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे.
१) गोराई येथील आरटीएस केंद्रावर गेल्या वर्षभरापासून सुमारे १०० टनापेक्षा अधिक कचरा जमा झाला असण्याची शक्यता आहे.
२) हे केंद्र तात्पुरते असल्याने येथील कचरा डम्पिंग ग्राऊंडवर हलवला जाणार आहे. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू करून अर्ज मागवले आहेत.
३) येत्या आठवडाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने येथील कचरा डम्पिंग ग्राऊंडवर नेला जाईल.