लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लाडक्या गणरायापाठोपाठ मंगळवारी सायंकाळी मुंबईत घराघरांमध्ये गौराईचे आगमन झाले. यावेळी सुवासिनींनी पारंपरिक गीते गात त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले. यानंतर गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली.
गणरायाच्या आगमनानंतर वेध लागतात ते गौरींचे. मंगळवारी ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे घरोघरी आगमन झाले. महाराष्ट्रातील सर्वच भागातील नागरिक मुंबईत वास्तव्यास आहेत. प्रत्येक कुटुंबाने आपापल्या चालिरीती, प्रथेनुसार गौराईचे स्वागत केले. काहींच्या घरी गौरींची मूर्ती अगदी ५ ते १० इंचापासून ते दोन ते तीन फुटांपर्यंत आहे. तर काही ठिकाणी गौरीचे संपूर्ण पुतळे सजविण्यात आले आहेत. महिलांनी शालू, पैठणी नेसवून गौरीला सजवले असून, सोन्याचे दागदागिने घालून शृंगार केल्याचे पाहायला मिळत आहे. गौरीच्या आगमनानंतर तिला भाजी-भाकरीचा, तर काही ठिकाणी गोड नैवेद्य दाखविण्यात आला. बुधवारी गौरपूजन आणि महाप्रसादाचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर रात्रभर गौराईचा जागर केला जाणार आहे.
ओवशाच्या खरेदीसाठी गर्दी-
१) गौरी पूजनाच्या दिवशी ओवशासाठी लागणारी सुपे, रोवळी बाजारात विक्रीसाठी आल्या असून, मंगळवारी त्या खरेदीसाठी महिलांनी बाजारात एकच गर्दी केली होती.
२) ओवशात वाण भरण्यासाठी भाज्यांची पाने प्रामुख्याने वापरतात. त्यामुळे पडवळ, भोपळा, काकडी, करांदा, दोडका या भाज्या तसेच त्यांची पानेही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली.