Join us

आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा! आज घरोघरी माहेरवाशीण गौराईचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 9:33 AM

माहेरपणासाठी येणाऱ्या गौराईचे म्हणजेच गौरीचे लिंबलोण उतरवून स्वागत केले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : माहेरपणासाठी येणाऱ्या गौराईचे म्हणजेच गौरीचे लिंबलोण उतरवून स्वागत केले जाते. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याचे असे स्वागत करण्याची परंपरा आहे. विशेषतः घरी येणारी पाहुणी जर माहेरवाशीण असेल, तर तिचे कौतुकही खास वेगळेच. 

माहेरी येणाऱ्या गौरीचे म्हणजेच देवी पार्वतीचे स्वागत कौतुकाने, उत्साहाने केले जाते. आज गौरींचे घरोघरी आगमन होत आहे. गणेशाचे आगमन झाल्यानंतर लगेचच गौरींचा सण येतो. भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींचे पूजन केले जाते म्हणून त्यांना ज्येष्ठागौरी असेही म्हटले जाते. गौरींचे अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. म्हणजेच आदल्या दिवशी संध्याकाळी गौरी आणल्या जातात, दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.

खरेदीसाठी महिलांची गर्दी-

महिलांनी गौरीचा मुखवटा, आभूषणे, विविध प्रकारची फळे, फुले खरेदी करण्यासाठी महिलांनी बाजारात गर्दी केली होती. पूजेचे साहित्य, फराळ, मिठाई आणि इतर साहित्यांची जुळवाजुळव करणे आणि गौरी आगमनाच्या सजावटीत महिलावर्ग व्यस्त आहे.

गौरी नटली इमिटेशन ज्वेलरीने-

गौरींसाठी इमिटेशन ज्वेलरी खरेदीकडे महिलांचा कल दिसून आला. गणेशोत्सवात सोन्याचे दागिने वापरण्याची परंपरा लोप वापत असतानाच यंदा महिलांनी मोठ्या प्रमाणात इमिटेशन दागिने खरेदी केल्याने हा बदल अधोरेखित झाल्याचे नीता म्हात्रे या व्यावसायिकानी सांगितले.

गौरीपूजनाच्या विविध पद्धती-

१) घरोघरी कुलाचाराप्रमाणे वेगवेगळे गौरीपूजन केले जाते. काही ठिकाणी उभ्या, मातीच्या किंवा धातूच्या (मुखवटे) गौरी असतात. 

२) काही ठिकाणी नदीतील पाच किंवा सात खडे आणून गौरींचे पूजन केले जाते. खडे आणताना मागे वळून पाहायचे नाही, असे सांगितले जाते.  खडे एखाद्या कलशात ठेवून त्याचे पूजन केले जाते. काही घरांमध्ये तांब्याच्या भांड्यावर मुखवटे रेखाटून गौरीपूजनाची परंपरा आहे. 

३) काही घरांमध्ये तेरड्याच्या झुडुपाची गौरी म्हणून पूजा केली जाते. मुखवट्याच्या गौरीचे आवाहन करताना हे मुखवटे तबकामध्ये ठेवले जातात. तसेच त्यावर वस्त्र पांघरले जाते. 

टॅग्स :गणेशोत्सव 2024मुंबईगणेश चतुर्थी २०२४