नाल्यातून किती गाळ काढला, कुठे नेऊन टाकला, यावर ‘वॉच’; मनपाकडून जिओ टॅगिंग बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 09:37 AM2024-04-22T09:37:23+5:302024-04-22T09:41:56+5:30
मुंबई महापालिकेकडून नालेसफाईसाठी जिओ टॅगिंग बंधनकारक.
मुंबई : यंदा मुंबई महापालिकेने कंत्राटदारांना नालेसफाई सुरू होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि ते संपल्यानंतर, अशा तीन टप्प्यांमध्ये चित्रफित व छायाचित्रे काढून ती आपल्या सॉफ्टवेअरवर अपलोड करणे बंधनकारक केले आहे. त्यात प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअल टाइम जिओ टॅग) याचा समावेश असणार आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मार्चच्या पहिल्या आठवड्यात नालेसफाई सुरू झाली आहे. गाळ काढण्याची कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ३१ मे २०२४ पर्यंत पूर्ण करावीत. त्यासाठी आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, अशा सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांकडून हातचलाखी होऊ नये आणि कामात पारदर्शकता राहावी, यासाठी पालिकेने यंदा कंत्राटांमध्ये सक्त अटी व शर्तींचा समावेश केला आहे.
त्यानुसार दररोज नाल्यांमधून गाळ काढल्यानंतर तो ठेवल्याची जागा, नाल्याकाठची रोजची छायाचित्रे, गाळ डंपरमध्ये भरण्यापूर्वी तो पूर्ण रिकामा असल्याचे दर्शवणारे चित्रण, डंपरमध्ये गाळ भरताना व भरल्यानंतरचे चित्रण, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर आलेल्या व जाणाऱ्या डंपरच्या क्रमांकाची तसेच वेळेची नोंद करणे, तसेच क्षेपणभूमीवर ये-जा करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा पालिका कंत्राटदारांकडून उभारून घेत आहे.
४७.६० टक्के गाळ आतापर्यंत काढला-
१) दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून मुंबईतील मोठ्या नाल्यांमधून, तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ काढला जातो.
२) पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून गाळ उपशाचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबईतील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट ठरविले जाते.