लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शारदीय नवरात्रोत्सवात घरोघरी घटस्थापना होते. या उत्सवासाठी लागणाऱ्या घटांपासून पूजेच्या साहित्याची रेलचेल बाजारात दिसत आहे. घटस्थापनेसाठी आवश्यक असणारे घट अगदी ४० रुपयांपासून मिळत आहेत. त्यातही वैविध्य पाहायला मिळत असून, मातीचे साधे घट त्याचबरोबर नक्षीकाम करून सजविलेले आकर्षक घटही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पसंतीनुसार त्यांची खरेदी सुरू आहे.
काही ठिकाणी मातीचा, तर काही ठिकाणी, तांबे, पिळत, चांदी किंवा स्टील असा धातूचा घट बसवितात. घटस्थापनेच्या दिवशी ऐनवेळी धावपळ होऊ नये, म्हणून आधीपासूनच त्यानुसार घट, माती यांची खरेदी जोरात सुरू आहे. काही ठिकाणी सप्तधान्य, काही ठिकाणी पंचधान्य, तर काही ठिकाणी नुसते गहू मातीत टाकले जातात. आपल्या प्रथेनुसार धान्य पाखडून, निवडून ठेवण्यात महिला वर्ग मग्न आहे. काही ठिकाणी घटाची स्थापना होत नाही, पण अखंड नंदादीप लावला जातो. विड्याची पाने, आंब्याची पाने, फुले यांची आवक बाजारात वाढली आहे. नवरात्रोत्सवात घरोघरी घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते. या नऊ दिवसांत अनेक भाविक उपवासही करतात. त्यामुळे फळे, उपवासाचे पदार्थ, सुकामेवा यांनाही मोठी मागणी आहे.
यासाठी बसविले जातात घट-
नवरात्रीतील नवदुर्गेच्या पूजेचा भाग म्हणून घटस्थापना केली जाते. घरात घट बसवला जातो. या घटस्थापनेचा संबंध थेट कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी असतो. घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण. म्हणूनच यानिमित्त शेतात जी पिके पिकवली जातात, ज्यातून आपले पोट भरतेय, त्याप्रती श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. घटस्थापनेला घटासमोर शेतातील माती आणली जाते.
नक्षीकाम केलेले घट ठरताहेत लक्षवेधी-
१) यंदाही बाजारात लाल, काळ्या रंगाच्या घटांसोबत आकर्षक नक्षीकाम केलेले घट दिसून येत आहेत.
२) रंगीत लेस, आकर्षक खडे यांनी घट सजविले जात आहे. १५० ते २५०० रुपयांपर्यंत या घटांच्या सजावटीनुुसार किमती आहेत. ग्राहक आवडीनुसार त्यांची खरेदी करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.