Join us

रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकासासाठी एक पाऊल पुढे; वास्तुविशारदची नेमणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 9:52 AM

घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी संदीप शिर्के अँड असोसिएट्स या कंपनीची वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबई : घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी संदीप शिर्के अँड असोसिएट्स या कंपनीची वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बुधवारी पार पडलेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे. हे कंत्राट ३०६ कोटी रुपयांना देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा अंतिम आराखडा लवकरच तयार केला जाणार असून, पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

एमएमआरडीएकडून रमाबाई आंबेडकरनगर येथील ३३.१५ हेक्टर जागेचा विकास करून तेथील अंदाजे १४,२५७ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) यांच्या माध्यमातून हे पुनर्वसन केले जाणार आहे. यासाठी वास्तुविशारद नेमणुकीसाठी मागविलेल्या निविदांना हितेन सेठी अँड असोसिएटस, संदीप शिर्के अँड असोसिएट्स आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर या तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. यातील संदीप शिर्के अँड असोसिएट्स लघुतम निविदा दाखल केली होती. त्यांना आता आराखडा तयार करण्याचे आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम देण्यात आले आहे.

सल्लागाराकडून प्रकल्पाचा आराखडा अंतिम करण्याबरोबर इमारतींच्या बांधकामासाठी कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा तयार केल्या जाणार आहेत. येत्या दोन ते अडीच महिन्यांत पुनर्विकासासाठी कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा मागविण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्याअधिकाऱ्यांनी दिली.

१,५०० हून अधिक रहिवाशांसोबत करार-

१) सद्यस्थितीत एसआरएच्या माध्यमातून या भागातील बाधित झोपड्यांचे सर्वेक्षण, रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत पूर्व दुतगती महामार्गाच्या लगतच्या १,६९४ झोपड्यांपैकी पात्रता निश्चिती करण्यात आली. 

२) या प्रकल्पातील १४,२५७ पैकी ७,६२९ रहिवाशांची पात्रता निश्चिती झाली आहे. मात्र, अनेक रहिवासी या प्रक्रियेत अपात्र ठरले आहे. या रहिवाशांना पुढील दोन महिन्यांत आवश्यक कागदपत्रे सादर करून पात्रता निश्चिती करून घेता येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्याऱ्यांनी दिली.

३) पात्रता निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झालेल्या रहिवाशांबरोबर करार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे १,५०० हून अधिक रहिवाशांबरोबर करार करण्यात आले आहेत.

४) एमएमआरडीएकडून या रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी घरभाडे दिले जाणार आहे. घरभाड्याचे पैसे दिले जाताच ही घरे रिकामी केली जाणार आहेत, अशी माहिती एसआरएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :मुंबईघाटकोपरएमएमआरडीए