गोखले पुलावर गर्डरचे काम सुरू; रेल्वेच्या भागात ८६ पैकी २५ मीटर सरकविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 11:28 AM2024-09-06T11:28:24+5:302024-09-06T11:31:28+5:30
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले उड्डाणपुलाच्या दक्षिण बाजूला रेल्वे भागावर लोखंडी गर्डर २५ मीटरपर्यंत बुधवारी सरकविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले उड्डाणपुलाच्या दक्षिण बाजूला रेल्वे भागावर लोखंडी गर्डर २५ मीटरपर्यंत बुधवारी सरकविण्यात आला आहे. महाकाय असा गर्डर एकूण ८६ मीटर सरकविणे आवश्यक असून, त्यापैकी २५ मीटरपर्यंत सरकविण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर व पुढील ‘ब्लॉक’ मिळाल्यानंतर उर्वरित अंतरावर हा गर्डर सरकविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पश्चिम रेल्वेशी समन्वय साधण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.
पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होऊन हा भाग २६ फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यावरून हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. आता या पुलाचा दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी रात्री १० वाजल्यापासून ते गुरुवारी पहाटे ५ पर्यंत हा गर्डर रेल्वे भागावर सरकविण्यात आला.
असा बसवला गर्डर-
पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे सुटे भाग अंबाला येथील फॅब्रिकेशन प्रकल्पातून मुंबईत आणून जोडण्यात आले. प्रत्येक गर्डर एक मीटर रुंदीच्या पदपथासह १३.५ मीटर रुंद (३ अधिक ३ मार्गिका) आणि ९० मीटर लांब आहे.
गर्डरचे वजन सुमारे १,३०० टन इतके आहे. गर्डरच्या सुट्या भागाची जोडणी तसेच रेल्वे भागावर स्थापना करण्यासाठी प्रकल्पस्थळी कमी जागा असल्याने ३६० अंशामध्ये फिरणाऱ्या अवजड क्रेनचा उपयोग करण्यात आला. गर्डर पूर्णपणे बसवल्यानंतर क्रॅश बॅरिअर, डांबरीकरण, पोहोच रस्त्यांची कामे, पथदिवे, मार्गिकांचे रंगकाम केले जाणार आहे.
‘ब्लॉक’नंतर पुढील काम -
गोखले पुलासाठी गर्डर स्थापित करणे हे काम अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक आहे. पश्चिम रेल्वेने केलेल्या सूचनांप्रमाणे मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. रेल्वे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून रेल्वे वाहतूक व वीजपुरवठा या दोन्ही घटकांमध्ये ‘ब्लॉक’ मिळाल्यानंतर गर्डरचे पुढील काम केले जाईल. आताच्या टप्प्यानंतर गर्डर सरकविण्याचे काम पुढे तुलनेने सहज करता येणार आहे.
पोहोच रस्त्यांचे काम २०२५ पर्यंत-
दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे भागातील पुलाचे (रेल्वे ओव्हरब्रीज) काम १४ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तर, पालिका हद्दीत पोहोच रस्त्याचे काम ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.