लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून, बहुतांशी गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती मंडपात दाखल झाल्या आहेत. मंडळांनी मंडपासह लगतच्या परिसरात विद्युत रोषणाई केली आहे. मात्र, सर्व गणेशोत्सव मंडळांनी विद्युत उपकरणांच्या सुरक्षेवर भर द्यावा. जिथे गरज आहे; तिथे अर्थिंग द्यावी, असे आवाहन बेस्ट, महावितरण, अदानी आणि टाटा या वीज कंपन्यांनी केले आहे.
गणेशोत्सवात तात्पुरत्या स्वरूपात विद्युत संचमांडणी करताना विद्युतभार वाढ, घट, फेरबदल विद्युत पुरवठादार कंपन्यांच्या लेखी परवानगीशिवाय करू नये. तात्पुरते वीज मीटर लावण्यासाठी फायबर सिमेंट बोर्डचा वापर करावा. संचमांडणीची देखभाल-दुरुस्ती मान्यताप्राप्त विद्युत कंत्राटदाराकडून करावी. या कालावधीसाठी त्याची नेमणूक करावी. संचमांडणीत बसविण्यात येणारे रेसिडयुअल करंट डिव्हाइस बसावेत. ते कायमस्वरूपात राहतील याची काळजी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत ते बायपास करू नयेत. सर्व उपकरणांचे, विद्युत यंत्रांची अर्थिंग योग्य आहे का, ते तपासावे. वेळोवेळी चाचणी घ्याव्यात. मल्टी प्लगचा उपयोग करू नये. एका प्लगवर एकच मशीन जोडावी, अशा सूचना वीजपुरवठादार कंपन्यांनी केली आहे.
३० मंडळांना ‘टाटा’ची जोडणी-
१) टाटा पॉवर कंपनीने ३० पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळांना तात्पुरत्या वीज जोडण्या दिल्या आहेत. कंपनीने तात्पुरती वीज जोडणी देण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक दिला आहे.
२) आपत्कालीन स्थितीच्या वेळेला सर्व मंडपांचा वीजपुरवठा बंद करण्यासाठी एकच स्वीच ठेवा.
३) मंजूर झालेल्या विजेच्या क्षमतेपेक्षा मंडपातील विजेचा वापर जास्त नसावा.
४) एक्सटेन्शन कॉर्डसाठी थ्रीपिन प्लग वापरा.
५) वायरिंगला अनेक ठिकाणी जॉइंट देऊ नये.
महावितरणकडून घरगुती दराने वीज -
१) गणेशोत्सव मंडळांना महावितरणकडून जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे.
२) मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची मंडप परवानगी, पोलीस ठाण्याचा परवाना, विद्युत निरीक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल व राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत कागदपत्रे आवश्यक आहेत.
३) मंडळांना अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाइन भरल्यास गणेशोत्सव संपल्यानंतर वीजबिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम परत केली जाईल. महावितरणच्या ग्राहक सेवा केंद्राच्या टोल फ्री क्रमांकावर अधिक माहिती घेता येईल.