कृत्रिम तलावांचे लोकेशन गुगल मॅप दाखविणार; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेची व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 11:50 AM2024-08-07T11:50:36+5:302024-08-07T11:53:06+5:30
मुंबईत गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे आदी उपक्रम पालिकेने हाती घेतले आहेत.
मुंबई : गणेशोत्सवमुंबईत अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी शाहूची माती पुरविणे, जागा उपलब्ध करून देणे, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे आदी उपक्रम पालिकेने हाती घेतले आहेत. त्याचबरोबर नागरिकांना त्यांच्या घराजवळील कृत्रिम तलावांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या तलावांची ठिकाणे गुगल मॅप्सवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी कृत्रिम तलावांची संख्या २०० पेक्षा अधिक वाढविण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे, अशी माहिती पालिकेचे गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली.
गणेशोत्सवात पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा व तयारीची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना व्हावी आणि मंडळांना त्यांच्या सूचना थेट पालिका प्रशासनाकडे मांडता याव्यात, या उद्देशाने राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी समन्वय बैठक पालिका मुख्यालयात झाली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, मुंबई पोलिस दलाचे प्रतिनिधी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
एक खिडकी योजना सुरू-
१) राज्य सरकारच्या निर्णयानुसार गेली १० वर्षे शासनाच्या नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग पाच वर्षांसाठी विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे.
२) सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मागील १० वर्षात सर्व नियम कायदे यांचे पालन केले आहे व त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे स्वयंघोषणापत्र आवश्यक असणार आहे. परवानगीचे दरवर्षी नूतनीकरण करणे गरजेचे असेल. यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.
फिरत्या शौचालयांची संख्या वाढविणार-
१) विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम चौपाटी येथे भाविकांसाठी फिरत्या शौचालयांची संख्या वाढविण्यात यावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली.
२) त्यानुसार विसर्जनाच्या दिवशी फिरत्या शौचालयांची संख्या वाढविण्याचे निर्देश पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.
'क्यूआर कोड'वरही तलावांची माहिती-
गुगल मॅपसोबत क्यू आर कोड'द्वारेही भाविकांना, गणेश भक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा क्यू आर कोड' श्री गणेश मूर्तिकारांच्या मंडपाबाहेर दर्शनीय भागात लावण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्यासाठी मदत होणार आहे.