Join us  

गोराईच्या स्पीड बोट व्यवसायिकाला लुबाडले; तोतया पोलिसांनी अरेस्ट वॉरंट, न्यायालयाचे पत्रही पाठवले

By गौरी टेंबकर | Published: June 28, 2024 5:04 PM

'तुमच्यावर केस झाली तर तुम्ही २० वर्षे जेलमध्ये सडाल ', अशी भीती पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या भामट्यानी गोराईतील स्पीड बोट व्यवसायिकाला दाखवली.

गौरी टेंबकर, मुंबई: 'तुमच्यावर केस झाली तर तुम्ही २० वर्षे जेलमध्ये सडाल ', अशी भीती पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या भामट्यानी गोराईतील स्पीड बोट व्यवसायिकाला दाखवली. त्यानंतर त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी त्यांनी गोराई पोलिसात तक्रार दिली असून सदर भामट्यांचा शोध सुरू आहे.

तक्रारदार वेवल चुनेकर (२३) यांचा गोराई परिसरात टुरिस्ट स्पीड बोट चालवण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांना २६ जून रोजी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. कॉलरने तो दिल्ली कस्टममधून बोलत असल्याचे सांगत तक्रारदाराचे दिल्ली ते कंबोडिया असे पार्सल जात आहे. त्या पार्सलच्या तपासणीत पाच पासपोर्ट , पाच एटीएम कार्ड १७० ग्रॅम ड्रग्स, पाच किलो कपडे आणि ४५ हजार रुपये सापडले आहेत असे सांगितले. तेव्हा ते पार्सल मी पाठवले नसल्याचे चुनेकर यांनी त्याला सांगितले. त्यावर तुमचा कॉल दिल्ली क्राइम ब्रांचला ट्रान्सफर करतो असे सांगत त्यांना व्हिडिओ कॉल करण्यात आला. त्या कॉलवर पोलीस शिपायाचा गणवेश घातलेला व्यक्ती दिसत होता. ज्याने पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश घातलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडे फोन दिला. ज्याने चुनेकर यांची चौकशी करत तुमच्यावर केस रजिस्टर झाली तर तुम्ही वीस वर्षे जेलमध्ये सडणार अशी भीती घालत संध्याकाळी ७ वाजता पोलीस तुम्हाला अटक करतील असे सांगितले.

या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर १ लाख रुपये डिपॉझिट म्हणून पाठवा. जर तुम्ही बँक फ्रॉड केले नसेल तर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील असे आश्वासनही त्यांना देण्यात आले. पुन्हा पून्हा अटकेची भीती दाखवत चुनेकर यांना व्हाट्सअपवर अरेस्ट वॉरंट तसेच न्यायालयाच्या नावाने पत्र पाठवण्यात आले. एकंदर या दबावाला घाबरून चुनेकर यांनी भामट्याने दिलेल्या अकाउंटमध्ये १ लाख रुपये पाठवले. मात्र नंतर त्यांनी सदर क्रमांकावर फोन केल्यावर कोणी फोन उचलला नाही. हा प्रकार चुनेकर यांनी त्यांच्या मित्रांना सांगितल्यावर सायबर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी गोराई पोलिसात धाव घेतली.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस