मुंबई : मुंबईत सद्यस्थितीत ६ हजारांहून अधिक बांधकामे आणि प्रकल्पाची विकासकामे सुरू आहेत. यामध्ये समाविष्ट असणारी अनेक बांधकामे ही भूमिगत पद्धतीची आहेत. यामुळे अनेक भागात या बांधकामांसाठी अवैध पद्धतीने भूजल साठ्याचा उपसा होत असल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमींनी केल्या आहेत. याची दखल घेत महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरीटीकडून पालिका प्रशासन आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांना सत्यता पडताळून आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. नैसर्गिक पाणी स्रोतांचा अवैध पाणी उपसा केल्याने भूजल पातळीत मे महिन्यात होणारी घट जानेवारीतच झाल्याचा दावा तक्रारीत केला आहे.
नियंत्रण आवश्यक :
मुंबईतील विविध बांधकामांच्या ठिकाणी जर अवैध पद्धतीने नैसर्गिक स्रोतांमधून पाणी उपसा करण्यात आला तर त्याचा परिणाम मुंबईच्या वातावरणावर ही होऊन शकतो अशी चिंता पर्यावरण प्रेमी झोरू बथेना यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकाराला वेळीच नियंत्रण घालून यावर निर्बंध आणण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यामुळे वाढली पाण्याची मागणी :
आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून, सद्य:स्थितीत मुंबईची लोकसंख्या १ कोटी २९ लाख ६७ हजार ९९६ इतकी आहे. हीच लोकसंख्या २०४१ मध्ये १ कोटी ७२ लाखांवर पोहोचले, असा अंदाज महापालिकेने वर्तवला आहे.
त्यामुळे लोकसंख्येत वाढ होताच रोजच्या पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होऊन ६,५३५ दशलक्ष लिटर झाली आहे. पाणीपुरवठ्याच्या तुलनेत ही मागणी दुपटीने वाढली आहे, असा अंदाज मुंबई महापालिकेने व्यक्त केला आहे.
उन्हाळ्यात विशेष म्हणजे एप्रिल मे महिन्यात धरण क्षेत्रातील साथ कमी झाल्यामुळे भूजल स्रोतांमधून होणाऱ्या पाणी पुरवठ्याची मागणी वाढते. मात्र मागील काही वर्षांपासून बांधकामे आणि विकासकामांसाठी अवैध पद्धतीने भूजल स्रोतांमधील पाण्याचा उपसा होत असल्याने भूजल पातळीत घट होत आहे. त्यामुळे आता या स्रोतांमधून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर ही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
पर्यावरणावर निर्माण होणार प्रश्न :
१) खासगी विकासक आपल्या परिसरातही नैसर्गिक स्रोतांमधून पाणी उपसा करू शकतो का ?
२) अशा याप्रकारे पाण्याचा अवैध उपसा करून पाणी सांडपाण्यात सोडले जाऊ शकते का?
३)भूजल पातळीत घट होण्यास कारणीभूत असणाऱ्या या प्रकाराला कोस्टल झोन अथॉरिटीची परवानगी आहे का ?