Join us

आर्थिक राजधानीतही हुंड्यासाठी छळ थांबेना; ५ महिन्यांत महिलांसंबंधित २ हजार ५८४ गुन्हे नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 11:09 AM

ग्रामीण भागांप्रमाणे मुंबईतही हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ वाढत असून, गेल्या पाच महिन्यांत मुंबई पोलिसांनी २०१ गुन्ह्यांची नोंद केली आहे.

मुंबई : ग्रामीण भागांप्रमाणे मुंबईतही हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ वाढत असून, गेल्या पाच महिन्यांत मुंबई पोलिसांनी २०१ गुन्ह्यांची नोंद केली आहे. यापैकी १७६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. दिवसाला एक ते दोन महिला हुंड्यासह कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार ठरत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चार महिन्यांतील आकडेवारी कमी असली तरी अत्याचाराचा सूर पूर्णपणे थांबलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे हुंड्यासाठी छळणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच महिन्यांत महिलांसंबंधित २ हजार ५८४ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी २ हजार ३०४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये ३९७ जणी विकृत वासनेच्या शिकार ठरल्या, ५०९ जणींच्या अपहरणाची नोंद झाली आहे. हुंड्यासाठीही महिलांचा मानसिक, शारीरिक छळ सुरू असून, २०१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हुंड्याव्यतिरिक्त होत असलेल्या छळप्रकरणी १८५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 

११ हत्या, १० जणींची आत्महत्या-

११ जणींची हुंड्याव्यतिरिक्त विविध कारणांमुळे हत्या करण्यात आली आहे, तर १० जणींनी अन्य तणावांतून टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांकडून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न-

कुटुंबातील वाद पोलिसांपर्यंत आल्यानंतर थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी महिला अधिकारी व कर्मचारी सुरुवातीला त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घेऊन पुढील कार्यवाही करतात. महिला कक्षाकडून अनेक प्रकरणांत समेट घडवून संसार जोडण्याचे काम या माध्यमातून करण्यात येत आहे. 

पोलीस उपायुक्त (महिला अत्याचार प्रतिबंधक शाखा) हे महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेचे प्रभारी असून, त्यांच्या अंतर्गत कक्ष १, कक्ष २ आणि महिला साहाय्य कक्ष यांचा समावेश होतो. कक्ष २ हा हुंडाबळी, हुंड्याच्या संबंधित आत्महत्या आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत उद्भवणारे इतर गुन्हे, भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ (अ) अंतर्गतचे गुन्हे तसेच कौटुंबिक हिंसाचार व हुंड्याशी निगडित इतर गुन्ह्यांचा तपास तसेच सदरबाबत प्राप्त तक्रार अर्जाची चौकशी आणि निपटारा करण्याचे काम करतात.

हुंड्यासाठी पाच जणींचा बळी घेण्यात आला आहे, तर ४ जणींनी आयुष्य संपविले. गेल्या वर्षी पाच महिन्यांत २९० गुन्हे दाखल करण्यात आले होते.

टॅग्स :मुंबईमहिलागुन्हेगारीपोलिसहुंडा प्रतिबंधक कायदा