Join us  

फेरीवाला धोरण; महिला आरक्षण सोडत २९ जुलैला, नगर पथविक्रेता समितीची निवडणूक : पालिकेची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 10:34 AM

महापालिका मुख्यालयातील समिती सभागृह क्रमांक २ मध्ये सोडतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

मुंबई : फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नगरपथ विक्रेता समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवार, २९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता सोडत काढण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालयातील समिती सभागृह क्रमांक २ मध्ये सोडतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या सोडतीचे पालिका ‘यू ट्यूब’वरून थेट प्रक्षेपणही करणार आहे.

केंद्र शासनाच्या पथविक्रेता अधिनियम - २०१४ अंतर्गत महाराष्ट्र पथविक्रेता अधिनियम - २०१६ मधील तरतुदींच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक तसेच समन्वयन अधिकारी (फेरीवाला धोरण) यांच्या निर्देशांनुसार नगरपथ विक्रेता समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीच्या रचनेमधील एकूण आठ प्रतिनिधींपैकी एक तृतीयांश म्हणजेच एकूण तीन पदे ही महिलांसाठी राखीव आहेत.

तीन जागा राखीव-

१) नगरपथ विक्रेता समितीच्या रचनेमधील एकूण आठ प्रतिनिधींमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, इतर मागासवर्ग, विकलांग (प्रत्येकी १) आणि खुला प्रवर्ग (३) अशी सदस्य रचना आहे. यापैकी तीन जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तीन जागा निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येईल.

२) राज्याच्या कामगार आयुक्तांनी निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली ही सोडत होईल. तसेच सोडत प्रक्रियेवेळी प्रत्येक पथविक्रेता संघटनेचा प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित असेल. 

३) पथविक्रेत्यांची निवडणूक घेण्यासाठी नोंदणीकृत पथविक्रेता मतदार यादी पालिकेच्या संकेतस्थळावर, प्रत्येक विभाग कार्यालयांत प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर यांनी दिली.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाफेरीवालेनिवडणूक 2024