मुंबई : रोजच्या जीवनातील आणि जेवणातील महत्त्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल. बाजारात असलेल्या खाद्यतेलात भेसळ होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे असे तेल खाण्यासाठी वापरल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होतो. भेसळयुक्त तेलामुळे रक्तवाहिन्यांचे आजार जडतात. यामुळे हृदयविकाराचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यासाठी सुटे खाद्यतेल वापरण्याचे टाळावे, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.
सोयाबीन, पाम, करडी, सूर्यफूल, शेंगदाणा, राईस बॅन आदी खाद्यतेलाला बाजारात मोठी मागणी असते. या तेलाच्या उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या आता बाजारात आहेत. आपलेच तेल शुद्ध असल्याचा दावा प्रत्येक जण करतो. तेलाच्या घाण्याच्या माध्यमातून काढलेले तेल सर्वाधिक सकस व आरोग्यदायी असल्याचा दावा केला जातो. पण या सुट्ट्या तेलात अनेकदा भेसळीचे ग्रहण लागते. दूरगामी परिणाम करणारे आरोग्याच्या अडचणी यांना सामोरे जावे लागते. घरात असलेल्या तेलाची शुद्धता पाहायची असेल तर काही ग्रॅम तेल काही तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा, काही तेलात मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते थंड तापमानात घट्ट होते.
किराणा दुकानांत सर्रास विक्री-
सुट्टे खाद्यतेल लहान-मोठ्या किराणा दुकानातून सर्रास विक्री केली. गरीब सर्वसामान्य कुटुंब या तेलाचे मुख्य ग्राहक आहेत. पॅकबंद डब्यातील तेल ज्यांना परवडत नाही ते रोजच्या भाजीला लागेल तेवढेच तेल विकत घेऊन जातात. हे तेल भेसळयुक्त असतेच असे नाही; मात्र ते कोणी कुठे, कधी व कसे बनवले, याची परिपूर्ण माहिती ना दुकानदाराला असते ना ग्राहकाला. त्यामुळे हे सुट्टे तेल शंका उत्पन्न करणारे ठरते.
नियमित तपासणी गरजेची-
शहरांसह ग्रामीण भागात खुल्या खाद्यतेलाची सर्रासपणे विक्री होती. तेल शुद्ध की अशुद्ध यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. औद्योगिक वसाहतीत तसेच एमआयडीसीतही तेलाचे कारखाने आहेत, या ठिकाणी नियमित तपासणी होत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळते.
तज्ज्ञ काय सांगतात...
भेसळयुक्त सुट्टे तेल स्वस्तात मिळत असेल तरी ते घेण्याचे टाळावे. चार पैसे वाचवायला गेलो तर अनेक आजार शरीराला त्रासदायक ठरतील. भेसळयुक्त खाद्यतेलात घातक पदार्थ असतात, जे हृदय व रक्तवाहिन्यांच्या मंदीचे आजार देऊन जातात. हे खाद्यतेल लठ्ठपणा, टाईप टू चा मधुमेह यासारख्या आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते.
अशी केली जाते भेसळ-
१) खाद्य तेलामध्ये केलेली भेसळ प्रथमदर्शनी ओळखू येत नाही. त्याच्या चवीमध्ये फरक येतो; पण तोही तितकासा लक्षात येत नाही.
२) खाद्यतेलात भेसळ करण्यासाठी रॅन्सिड तेल, मार्जरीन, सुपर सोयाबीनचे तेल, कापूस बियाणे, आर्गेमोन तेल, पपईच्या बिया, पाम तेल आणि खनिज तेल यांचा वापर केला जातो. इतरही काही द्रव पदार्थ मिसळून तेलाच्या रंगावर काम केले जाते.