लग्नासाठी आरोग्य कुंडली का पाहत नाही? वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 11:22 AM2024-07-06T11:22:32+5:302024-07-06T11:26:57+5:30

लग्न करणे म्हणजे आपल्याकडे आनंदाचा सोहळा असतो.

in mumbai health tips look at health horoscope for marriage advice given by medical experts | लग्नासाठी आरोग्य कुंडली का पाहत नाही? वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला सल्ला

लग्नासाठी आरोग्य कुंडली का पाहत नाही? वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला सल्ला

मुंबई : लग्न करणे म्हणजे आपल्याकडे आनंदाचा सोहळा असतो. कुणी प्रेमविवाह करतात तर कुणी वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदवून लग्न करतात. तर काहीवेळा ओळखीच्या आणि नातेवाईकांच्या माध्यमातून लग्न होतात; मात्र लग्न ओळखीच्या घरात आपली मुलगी जावी असा समज असणारे पालक मुलाचे किंवा मुलीचे लग्न काहीवेळा नातेवाईकांमध्येच लावून देतात; मात्र या अशा नात्यामध्ये लग्न केल्यामुळे  भावी पिढीच्या आरोग्यावर वाईट  परिणाम होऊ शकत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.   

ज्या पद्धतीने लग्न ठरविण्यासाठी ज्योतिषाकडून जन्मकुंडली पाहिली जाते. त्याचप्रमाणे लग्न ठरविल्यानंतर मुलाला मुलीला काही आजार आहेत का ? याची जन्मकुंडली फार कमी प्रमाणात पाहिली जाते.

अनेकवेळा आम्ही असे रुग्ण पाहिले आहेत की ज्यांची नातेवाईकांमध्ये लग्नं झाली आहेत त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना जावे लागते. त्यात दुर्मिळ जनुकीय आजार आणि आनुवंशिक आजार पाहावयास मिळतात. नातेवाईकांमध्ये लग्न केल्यामुळे त्यांच्या मुलाच्या मेंदूच्या विकासवाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्याच्या बुद्ध्यांकावरही याचा परिणाम दिसून येतो. विशेष म्हणजे अशा पद्धतीच्या लग्नामुळे थॅलेसेमिया आणि सिकलसेल सारखा आजार मुलांना होऊ शकतो.- डॉ. आरती अढे, स्त्रीरोगतज्ज्ञ, हिंदुजा रुग्णालय

नातेवाइकांमध्ये होणाऱ्या लग्नामुळे आजारांचा धोका-
    
आरोग्य कुंडली म्हणजे काही मुलाला किंवा मुलीला काही जुनाट आजार आहेत का ? ज्याचा त्याच्या येणाऱ्या पिढीवर परिणाम होऊ शकेल. यासाठी रक्ताचे रिपोर्ट पाहिले जातात. जर नातेवाईकांत लग्न करणार असाल तर त्यामुळे कदाचित सिकलसेल, थॅलेसेमिया, आनुवंशिक आजार, अनेकवेळा नातेवाईकांमध्ये होणाऱ्या लग्नामुळे मुलाच्या मेंदू वाढीवर परिणाम होऊ शकतो. 

अनेकांना नात्यात लग्न केलेल्या होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती नसते. नात्यात लग्न करू नये असे अनेकवेळा डॉक्टर आपल्याला सांगत असतात; मात्र तरीही लग्नं केली जातात. नात्यात लग्न झाल्यावर काय काळजी घ्यावी याचा सल्ला डॉक्टरांकडून घेतलाच पाहिजे. कारण जवळच्या नात्यातल्या व्यक्तीशी लग्न केल्यामुळे होणारे मूल गतिमंद होऊ शकते किंवा बाळाला थॅलेसेमियासह अन्य आजारांचाही धोका असतो.  

कोणते आजार होण्याची शक्यता असते? 

१) थॅलेसेमिया.

२) सिकलसेल.

३) बाळ आईच्या पोटातच दगावण्याची शक्यता. 

४) गर्भपात होऊ शकतो.

५) आनुवंशिक आजार वाढू शकतात. 

६) मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता.

Web Title: in mumbai health tips look at health horoscope for marriage advice given by medical experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.